नांदेडहून परभणी शहरात अॅपे रिक्षातून येणारा सितार कंपनीचा गुटखा महामार्ग पोलिसांनी पाठलाग करून खानापूर नाक्याजवळ पकडला. हा गुटखा अन्न व भेसळ विभागाने जप्त केला. त्याची किंमत ९० हजार रुपये आहे.
असोला पाटीजवळ नवीनच महामार्ग पोलिसांची तपासणी चौकी सुरू झाली आहे. दुपारी बाराच्या सुमारास नांदेडवरून एमएच २६ एडी ५६९६ क्रमांकाची अॅपेरिक्षा परभणीकडे येत होती. रिक्षाला महामार्ग पोलिसांनी थांबविण्यासाठी हात दाखवला. परंतु ऑटोचालक शेख मुस्तफा याने रिक्षा थांबवली नाही. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून खानापूर पाटीनजीक रिक्षा पकडली. ऑटोची तपासणी केली असता यामध्ये सितार कंपनीच्या गुटख्याच्या पाच गोण्या आढळून आल्या.
पोलिसांनी गुटख्यासंबंधित अन्नभेसळ विभागाचे सहआयुक्त केदारे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पंचनामा करून तो गुटखा जप्त केला. परभणी जिल्ह्य़ात गुटखा बंदीच्या निर्णयानंतर आजपर्यंत अंदाजे ९ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. यात बहुतांश कारवाया पोलिसांनी केल्या आहेत. अन्न भेसळ विभागाकडून पोलिसांनी पकडलेला गुटखा पंचनामा करून जप्त करण्याची कारवाई केली जाते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 14, 2012 10:56 am