केंद्र सरकारने येत्या काळात स्मार्ट सिटीद्वारे छोटय़ा घरांचे स्वप्न दाखविल्याने छोटय़ा घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांनी अशी घरे घेण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे छोटी घरे बांधणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांसाठी हा पाडवा काहीसा गोड असल्याचे अशा बांधकाम व्यावसायिकांकडून बोलले जात आहे. घर घेणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी युरोप सहल, कार, दुचाकी जिंकण्याची संधी, मोफत सुविधा, स्टॅम्प डय़ुटी, नोंदणी शुल्क माफ आणि सवलतींचा वर्षांव अशा प्रकारच्या अनेक जाहिराती माध्यमांमधून सध्या दिसून येत आहेत. मंदीचा सामना करण्यासाठी अनेक बांधकाम व्यावसायिकांनी काढलेल्या या युक्त्या आहेत. तरीही घरांना उठाव नसल्याचे चित्र आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केलेल्या जाहिरातींमुळे बांधकाम क्षेत्रात आलबेल असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण ह्य़ा जाहिराती छोटय़ा घरांच्या जास्त असल्याचे अश्विन रुपारेल यांनी सांगितले. छोटय़ा घरांना आजही जास्त मागणी आहे. ४० लाख रुपयांपर्यंतची घरे विकली जात असल्याचे त्यांनी सांगितले.  मुंबई व नवी मुंबईतील दोन बडय़ा बांधकाम व्यावसायिकांनी शहराबाहेर छोटय़ा घरांचे प्रकल्प सुरू केले असून त्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. छोटय़ा घरांची ही योजना अशीच पुढे सुरू राहणार असून बांधकाम क्षेत्रात सुरू असलेली मंदी एक वर्ष कायम राहण्याची भीती बांधकाम व्यावसायिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. त्यामुळे छोटी घरे बांधणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या घरात मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खुशी आहे तर मोठी घरे बांधणाऱ्या व्यावसायिकांमध्ये गम आहे. सध्या महामुंबई क्षेत्रात कोट्टीच्या कोटी उड्डाणे करणारी सहा हजार घरे विक्रीविना पडून असल्याचे सांगण्यात येते.