उरण तालुक्यातील सारडे गावातील एका मातीच्या घरात राहणाऱ्या कुटुंबाला नागापासून वाचविण्यात सर्पमित्राला यश आले आहे. या चिरनेर येथील जयवंत ठाकूर या सर्पमित्राने हे धाडस केले असून त्याचे सर्व कौतुक होत आहे. उरणच्या पूर्व विभागातील चिरनेर येथील फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) या निसर्ग संरक्षणासाठी काम करणाऱ्या संघटनेचे अध्यक्ष जयवंत ठाकूर यांना सकाळी घरात नाग शिरला आहे असा दूरध्वनी सारडे गावातून आला होता.  दिलेल्या पत्त्यावर जयवंत ठाकूर हा घराजवळ पोहोचला. घराजवळ गेल्यानंतर बैठय़ा स्वरूपाचे दहा बाय पंधराचे जुन्या पद्धतीचे मातीचे कौलारू घर होते. ते घर पाहूनच घरातील रहिवाशांची स्थिती लक्षात आली. ज्या घरात नाग होता त्याच घरात एक लहान मूलही होते. घरातील उंदीर पकडण्यासाठी हा नाग घरात शिरला होता. नाग घरातील उंदरावर दबा धरून बसला होता.  घरात वस्तूंची खूप गर्दी होती. तर बांधकाम मातीचे होते. पावसाळ्यात अशा घरांना अधिकच धोका असतो. त्यामुळे घरात दबा धरून बसलेला नाग पकडणे अवघडच होते.चुकून नाग मातीच्या भिंतीत शिरला असता तर घराच्या भिंती तोडण्याशिवाय पर्याय नव्हता, त्यामुळे घराचे नुकसान होणार होते. त्यामुळे घरावरील कौलांचा आधार घेत छपरावर चढून नाग पकडण्याचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणची कौले काढली तेथून वेळेवर नाग निसटला त्यामुळे दुसऱ्या ठिकाणची कौले काढावी लागली. तेथून तो दिसल्यावर त्या वेळी चपळाईने नागाची शेपटी धरून त्याला पकडले. नागाने त्याच वेळी आपल्या बचावासाठी घरातील एका बांबूला विळखा घातला होता.  तो फूत्कारू लागला. नाग पकडण्यातील धोका वाढला होता.मात्र अशाही स्थितीत जीव धोक्यात टाकून जयवंतने नागाचे डोके धरून त्याला पकडले. त्याबरोबर त्या घरातील कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.  मातीच्या घराचे नुकसान व सापाचे जीव वाचविण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावीत अखेर नागाला सुखरूप पकडून जयवंत ठाकूर याने त्याला त्याच्या जंगलातल्या सोडले. जयवंत ठाकूर याच्या या धाडसाबद्दल त्या कुटुंबासह ग्रामस्थांनी त्याचे खूप कौतुक केले.