महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील पक्ष्यांचे पिंजरे रिकामे दिसू लागल्याने एकंदर व्यवस्थापनावरच संशयाची सुई वळली आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे नियम अटी व शर्तीनुसार महाराजबागेतील प्राणी आणि पक्ष्यांच्या पिंजऱ्यांची रचना करण्याची निर्वाणीची सूचना प्राधिकरणाच्या एका जबाबदार सदस्याने काही दिवसांपूर्वीच महाराजबाग व्यवस्थापनाला केल्यानंतरही पिंजऱ्यातील बहुतांश पक्ष्यांना सापांनी फस्त केल्याने नेहमी ऐकू येणाऱ्या निरागस किलबिलाट आता थंडावला आहे.
पक्ष्यांचे पिंजरे रहस्यमयरीत्या रिकामे होऊ लागल्याचे महाराजबागेत येणाऱ्यांच्या नजरेला पडल्यानंतर याचे गांभीर्य लक्षात आले. हा प्रकार व्यवस्थापनाच्या नजरेस आणून दिल्यानंतरही उपाययोजनांना विलंब होत असून तोवर बाकीचे पिंजरेही रिकामे होतील का, अशी शंका उत्पन्न झाली आहे. केंद्रीय प्रधिकरणाच्या इशाऱ्यानंतरही प्रशासन बदललेले नाही.
 महाराजबाग प्राणिसंग्रहालय तत्वत: मान्यतेवर कसेबसे सुरू आहे. ही मान्यता कायमची रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. प्राणिसंग्रहालयातील पिंजरे वर्षांनुवर्षे गंजलेल्या स्थितीत आहेत. त्याची डागडुजी करण्याइतपत पंकृविच्या व्यवस्थापानाने हात सैल सोडलेले नाही.  पिंजऱ्यातील जमीन घुशींनी पोखरून टाकल्याने घुशींच्या मागावर असलेले साप पोखरलेल्या जमिनीतून पिंजऱ्यात शिरून पिंजऱ्यातील पक्षी सहजपणे गिळंकृत करत असल्याची चर्चा आहे. ही वस्तुस्थिती व्यवस्थापन मान्य करण्यास तयार नाही.
महाराजबाग प्राणिसंग्रहालयात दुर्मिळ प्रजाती आणि विदेशी पक्ष्यांसाठी आठ पिंजरे उभारण्यात आले असून त्यात बदक, कबुतरे आणि चीन कोंबडय़ा होत्या, तर एका पिंजऱ्यात ससेही होते. सिल्वर, ग्रे कॉकिटेल, बजेरिगर यासारखे पक्षी येथील आकर्षण होते. मात्र, सापांनी ते फस्त केल्यामुळे पिंजरे रिकामे झाले आहे. आता फक्त याठिकाणी पोपट शिल्लक आहेत. प्राणिसंग्रहालयाला दिलेल्या भेटीत पिंजऱ्यात माती अंथरण्याचे काम सुरू होते. भोवतालची जमीन उंदीर व घुशींनी भुसभुशीत केल्याचे स्पष्ट दिसत आहे. यासंदर्भात महाराजबागेचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांनी पिंजऱ्यांमध्ये नैसर्गिक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी डागडुजी सुरू असल्याचे स्पष्ट केले. पिंजऱ्यातील पक्ष्यांपर्यत साप रात्रीच्यावेळी झडप घालत असतील. पोखरलेल्या जमिनीतून रात्री साप प्रवेश करू शकतात, ही वस्तुस्थिती बावस्कर यांनी मान्य केली. मात्र सुरक्षिततेसाठी पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचा दावा त्यांनी केला.  
महाराजबाग व्यवस्थापनाने वेळीच काळजी घेतली असती तर पक्ष्यांचा जीव वाचला असता. नव्याने निविदा काढून पक्षी विकत घेण्याची वेळ महाराजबाग प्रशासनावर आली आहे. प्राणिसंग्रहालयात असा प्रकार घडल्यामुळे त्याची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराजबाग प्रभात मित्रमंडळाचे उमेश चौबे यांनी केली आहे.