काळावर ठसा उमटवणाऱ्या प्रतिभावंतांनी कायम प्रस्थापित साहित्यात बंडखोरी केली. ही बंडखोरी करणाऱ्यांचेच साहित्य टिकून राहिले. तडजोडी करणे म्हणजे व्यवहार समजणे असा समज सर्वत्र असला, तरी मूल्यांसाठी त्याग करणाऱ्यांमुळेच समाज घडत जातो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी केले.
येथील गणेश वाचनालयात मुकुंदराव पेडगावकर यांच्या स्मृत्यर्थ आयोजित कार्यक्रमात साहित्य व संस्कृती या विषयावर दीक्षित यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमात पेडगावकर परिवाराच्या वतीने केरवाडी येथील स्वप्नभूमीचे संस्थापक सूर्यकांत कुलकर्णी यांना लोपामुद्रा पुरस्कार दीक्षित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कुलकर्णी दाम्पत्यास शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
साहित्य व संस्कृती या दोन भिन्न गोष्टी असल्या, तरी एकमेकांशी निगडित आहेत. साहित्य हा संस्कृतीचाच घटक आहे. जीवनात चैतन्यदायी, रसरशीत असे संदर्भ देत जे साहित्य निर्माण होते. त्याच साहित्याने संक्रमण काळातही समाजाला नेमकी दिशा दिली आहे. सध्याचा काळ संभ्रमाचा असला तरीही अशा वेळी प्रश्नांची उत्तरे लगेचच मिळतात, असे नाही. प्रश्न नीट समजून घेणे, हीसुद्धा उत्तराकडे जाण्याचीच वाट असते, असेही दीक्षित म्हणाले.
मंगेश पाडगावकर, प्रकाश होळकर, अरुण काळे आदींच्या कवितांचे संदर्भ देत प्रत्येक लेखकाची अभिव्यक्तीची पद्धत निराळी असते, असे सांगून सर्वाचेच व्यक्तिमत्त्व हे एका साच्यात कधी राहू शकत नाही. प्रत्येकाचा आपला वकूब, आवाका व जग समजून घेण्याची रीत यामुळे प्रत्येकाचा साहित्यातला अनुभव नवा ठरतो, असेही दीक्षित यांनी सांगितले.