‘केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे हरपून रात्र गेली’, ‘जीवलगा राहिले रे दूर घर माझे’, ‘चांदण्यात फिरताना’, ‘धुंदी कळय़ांना धुंदी फुलांना’ अशी भावगीते तसेच ‘उठी श्रीरामा पहाट झाली’, ‘प्रभाती सूर नभी रंगती’, ‘येई वो विठ्ठले’ ही भजने आणि ‘निगाहें मिलाने को जी चाहता है’, ‘दिल चीज क्या है आप मेरी’ अशी वैविध्यपूर्ण ठसकेबाज गाणी सादर करून ‘झी सारेगमप’चे उपविजेते डॉ. नेहा वर्मा, मंगेश बोरगावकर तसेच अपूर्वा गज्जला, सरला शिंदे, संपदा गोस्वामी या गायिकांच्या सुरांसह सुधीर गाडगीळ यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने ‘स्वरआशा’ने दिवाळीची पहाट रंगतदार केली.
प्रसिद्ध पाश्र्वगायिका आशा भोसले यांनी नुकतीच वयाची ८० वर्षे पूर्ण केली. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आशाताईंनी गायलेल्या गाण्यांचा कार्यक्रमावर आधारित ‘स्वरआशा’ ही पहाट पाडवा संगीतमय मैफल आमदार सतीश चव्हाण यांनी आयोजित केली होती.
कार्यक्रमाची सुरुवात ‘जय शारदे वागिश्वरी’ या भजनाने झाली. त्यानंतर सुधीर गाडगीळ यांनी कार्यक्रमाची सूत्रे हाती घेत आशा भोसले यांच्या आठवणी, किस्से सांगत कार्यक्रमात रंगत आणली.
औरंगाबादेत पुनर्जन्म- अपूर्वा गज्जला
औरंगाबाद-जालना मार्गावर काही वर्षांपूर्वी गायिका अपूर्वा गज्जला हिचा अपघात झाला होता. त्यात ती जबर जखमी झाली होती. महिनाभर तिच्यावर औरंगाबादेत उपचार सुरू होते. आता ती पूर्ण बरी झाली असून पुन्हा गायला लागली आहे. व्यासपीठावर येताच औरंगाबादकर रसिकांनी तिचे जोरदार टाळय़ांच्या गजरात स्वागत केले.
अपूर्वा म्हणाली, की मी या अपघातातून वाचले. खरेतर माझा औरंगाबादेत पुनर्जन्म झाला आहे. त्यानंतर तिने ‘एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी’ हे गीत सादर केले.