युवा सेना-युवा ब्रिगेडच्या वतीने येथे आयोजित दहीहंडी स्पध्रेत हिंदी-मराठी चित्रपटांतील तारे-तारकांनी हजेरी लावत परभणीकरांचा उत्साह वाढवला. नूतन विद्यालयाच्या प्रांगणावर झालेल्या या स्पध्रेत औरंगाबादच्या रणयोद्धा दहीहंडी मंडळाने एक लाख एक हजार रुपयांचे पहिले बक्षीस पटकावत बाजी मारली.
नूतन विद्यालयाच्या प्रांगणावर परभणीकरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या स्पध्रेला विश्वसुंदरी युक्ता मुखी, अभिनेत्री वर्षां उसगावकर, मकरंद अनासपुरे, डॉ. अमोल कोल्हे, क्रांती रेडकर, रश्मी पाटील, प्रतीक्षा जाधव आदींनी हजेरी लावली. परभणीकरांना प्रथमच मोठय़ा संख्येने तारे-तारका एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. युवा सेनेच्या वतीने संपर्कप्रमुख डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन केले होते. अर्जुन खोतकर, आमदार संजय जाधव, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, युवा सेनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. श्रीकांत पंडित, डॉ. पवन जाधव, डॉ. अमोल कोल्हे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडली. डॉ. पाटील यांनी उपस्थित सर्व कलाकार, पदाधिकारी व शहरवासीयांचे आभार मानले. उपस्थितांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आकर्षक अशी रोषणाई या वेळी केली होती.
‘स्वरराज ऑर्केस्ट्रा’च्या वतीने रसिकांसाठी या वेळी वेगवेगळी गाणी सादर करण्यात आली. दहीहंडी स्पध्रेला औरंगाबाद, परभणी, नांदेड, गंगाखेड या ठिकाणांहून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. दहीहंडीचे पहिले पारितोषिक औरंगाबादच्या रणयोद्धा दहीहंडी मंडळाने पटकावले, तर दुसरे पारितोषिक नांदेडच्या जय बजरंग दहीहंडी मंडळाने प्राप्त केले. तिसरे बक्षीस संत जनाई युवक मंडळ, गंगाखेड या संघाला मिळाले. अनुक्रमे एक लाख, ५० हजार, ३० हजार असे या पारितोषिकांचे स्वरूप होते. कार्यक्रमास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही मोठय़ा प्रमाणावर उपस्थिती लावली होती.