सतत ३२ वर्षांपासून सामना अधिकारी म्हणून कार्य करणारे आणि हजारपेक्षा अधिक सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करणारे जिल्ह्यातील मनमाड येथील सतीश सूर्यवंशी यांच्या विलक्षण अशा वेगळ्या वाटेवरील कारकिर्दीस अखेर न्याय मिळाला. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या वतीने कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त १५ जुलै रोजी तुळजापूर येथे आयोजित कबड्डी दिन कार्यक्रमात सूर्यवंशी यांना ज्येष्ठ पंच म्हणून गौरविण्यात येणार आहे. राज्यस्तरावरील हा पुरस्कार मिळविणारे सूर्यवंशी जिल्ह्यातील पहिलेच कबड्डी पंच ठरले आहेत.
मनमाडला ‘कबड्डीची पंढरी’ म्हणून ओळखले जाते. परशराम झाल्टे, मोहन गायकवाड, दिलीप पवार यांसारख्या चमकदार खेळाडूंसह दौलतराव शिंदे, केशव जाधव यांसारखे संघटक याच शहराने जिल्ह्याला दिले. सतीश सूर्यवंशी यांना मिळालेल्या पुरस्काराने कबड्डीच्या या पंढरीलाही न्याय मिळाला आहे. विद्यापीठाचे राष्ट्रीय खेळाडू म्हणून लौकिक मिळविणाऱ्या सूर्यवंशी यांना मैदानावरील खेळाडूंना नियंत्रणात ठेवणारी पंचगिरी अधिक भावली. त्यामुळेच १९८० मध्ये राज्य पंच परीक्षा आणि १९८२ मध्ये अखिल भारतीय पंच परीक्षा उत्तीर्ण झालेले सूर्यवंशी अजूनही कबड्डीत कार्यरत आहेत. जानेवारी २००७ मध्ये पनवेल येथे आयोजित द्वितीय विश्वचषक कबड्डी स्पर्धेत पंच म्हणून त्यांनी कामगिरी केली. या स्पर्धेत १४ देशांनी सहभाग घेतला होता. याशिवाय आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे जून २०११ मध्ये झालेल्या पहिल्या केपीएल (कबड्डी प्रीमियर लीग) स्पर्धेसाठी निवड झालेले महाराष्ट्रातील ते एकमेव पंच. नाशिक जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे उत्कृष्ट व ज्येष्ठ पंच म्हणूनही त्यांचा गौरव झाला आहे. अखिल भारतीय पातळीवरील अनेक कबड्डी स्पर्धा तसेच राष्ट्रीय कबड्डी स्पर्धामध्ये सामनाधिकारी व पंच म्हणून त्यांनी कामगिरी केली आहे. बालेवाडी (पुणे) येथे दोन वेळा त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकाचा तांत्रिक अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.
१९८२ पासून आजपर्यंत सतत ३२ वर्षांपासून कबड्डी क्षेत्रात सामना अधिकारी म्हणून ते काम करीत आहेत. तसेच मनमाडचा प्रथम कबड्डी कार्यकर्ता पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार आदी पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. कबड्डीने त्यांना केवळ मानसिक आनंद दिला असे नव्हे, तर कायमचे उदरनिर्वाहाचे साधनही मिळवून दिले. कबड्डीमुळेच १९८० मध्ये मुंबई येथे त्यांना भारतीय अन्न महामंडळात नोकरी मिळाली. अवघ्या सहा महिन्यांतच त्यांची मनमाड येथे बदली झाली. त्यामुळे घरच्या मैदानावर कबड्डीशी संलग्न राहणे त्यांना जमू शकले. अन्न महामंडळात खेळाडू म्हणून भरती होऊन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नवी दिल्ली येथे मार्च २०१२ मध्ये तत्कालीन अन्नपुरवठामंत्री के. व्ही. थॉमस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात सूर्यवंशी यांचादेखील समावेश होता. कबड्डी दिनानिमित्त सूर्यवंशी यांना मिळालेला पुरस्कार ही मनमाडसह जिल्ह्यातील कबड्डीप्रेमींसाठी निश्चितच एक आनंददायक आणि प्रेरणादायक घटना म्हणावी लागेल.