ऊसदराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेऊन पुकारलेल्या ४८ तासांच्या ‘बंद’ ला सोलापूर जिल्ह्य़ातील साखरपट्टय़ात लक्षणीय प्रतिसाद मिळाला. एसटी बसेसवरील दगडफेकीच्या दोन अनुचित घटनांचा अपवाद वगळता संपूर्ण जिल्ह्य़ात हे आंदोलन शांततेत सुरू असल्याचे दिसून आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी बंद काळात मुंबईकडे जाणारे दुधाचे टँकर आणि भाजीपाल्याची वाहतूक रोखण्याचे आवाहन केले होते. परंतु संपूर्ण जिल्ह्य़ातून मुंबईकडे दूध व भाजीपाल्याची वाहतूक पोलीस संरक्षणात होत असल्यामुळे त्यास अडथळा येऊ शकला नाही. आंदोलकांनी सामान्य प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून एसटी बसेसना ‘लक्ष्य’ केले नसल्याचे दिसून आले. संघटनेचे प्रदेश सचिव संजय पाटील-घाटणेकर यांनीही याबाबत दुजोरा देत हे आंदोलन शांततेच्या मार्गाने शंभर टक्के यशस्वी होत असल्याचा दावा केला. तथापि, बंद काळात एसटी बसेसची तोडफोड होऊ नये म्हणून एसटी बसेस पाच-सहाच्या एकत्रित संख्येने रस्त्यावर पोलीस बंदोबस्तात धावत होत्या. त्यामुळेही आंदोलनाला हिंसक वळण मिळू शकले नसावे, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र एसटी बसेसच्या दैनंदिन फेऱ्यांवर मोठा परिणाम दिसून आला. प्रामुख्याने कोल्हापूर, कराड, सांगलीकडे जाणा-या एसटी गाडय़ांची संख्या रोडावली होती. प्राप्त परिस्थितीत प्रवाशांनीही एसटीचा आधार न घेता रेल्वेतून प्रवास करणे पसंत केले. त्यामुळे रेल्वे गाडय़ांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्याचे पाहावयास मिळाले.
माढा, पंढरपूर, करमाळा तसेच माळशिरस, मंगळवेढा व बार्शी तालुक्यातील काही भागात बंदचा परिणाम जाणवला. जिल्ह्य़ात २९ सहकारी व खासगी साखर कारखाने असून त्यापकी २५ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. परंतु ४८ तासांच्या बंदमुळे बहुतांशी साखर कारखान्यांनी गाळप बंद ठेवले होते. विशेषत आंदोलनाचा जोर असलेल्या पंढरपूर, माढा, करमाळय़ात ही स्थिती दिसून आली.
करमाळा तालुक्यात करमाळय़ासह जिंती, पारेवाडी, कंदर, केम, चिखलठाण, वांगी, वाशिंबे, कोर्टी आदी भागातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. सकाळी करमाळय़ात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश चिवटे व हमाल पंचायतीचे अध्यक्ष सुभाष सावंत यांच्या नेतृत्वाखाली जनजागृतीपर पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर सुभाष चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आदिनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक प्रकाश जाडे-पाटील, नानासाहेब सुर्वे, सुजित बागल, नगरसेवक पप्पू सावंत, बाबा ननवरे, बाळू गोडसे, संतोष साळवे, बाळासाहेब लांडगे, बाबा घोडके, शहाजी ठोसल, शिवाजी बनकर, विवेक येवले, सुभाष परदेशी, आण्णा सुपनवर, अ‍ॅड. राहुल सावंत आदींचा प्रामुख्याने सहभाग होता.
बंद काळात करमाळय़ाजवळ शेलगाव-वांगी चौकात आंदोलक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी अकलूजहून औरंगाबादकडे जाणारी एसटी बस फोडण्यात आली. तर माढय़ाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव िशदे यांच्या विठ्ठलराव िशदे सहकारी साखर कारखान्याकडे चाललेला उसाचा ट्रॅक्टर रस्त्यावर पलटी करण्यात आला. पारेवाडी येथेही आंदोलक शेतकऱ्यांनी ‘रास्ता रोको’ करून पेटते टायर रस्त्यावर फेकून निदर्शने केली. कंदर येथील मासे लिलाव बंद पाडण्यात आला.
पंढरपुरात बंदला ८० टक्के प्रतिसाद लाभला. शेतकरी संघटनेचे नेते दीपक भोसले व प्रताप गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तहसीलदार सचिन डोंगरे यांना निवेदन सादर करण्यात आले. पंढरपूर शहरासह करकंब, गुरसाळे, भाळवणी आदी भागात बंदचा प्रभाव होता. जीवनावश्यक सेवांना बंदमधून वगळण्यात आले होते.
माळशिरस तालुक्यात सकाळी बंद पुकारण्यात आल्यानंतर एका एसटी बसवर जमावाने दगडफेक केली. परंतु यात कोणीही जखमी झाले नाही. एसटीचे किरकोळ नुकसान झाले. हा अपवाद वगळता तालुक्यात बंद शांततेत पाळण्यात आला. मंगळवेढा, बार्शी या भागातही साखरपट्टय़ात बंदला काही प्रमाणात प्रतिसाद दिसून आला. तर उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ या भागात बंदचा परिणाम दिसून आला नाही.