चंद्रपूरच्या महाकाली यात्रेत सहभागी होण्यासाठी दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातून आलेल्या यात्रेकरूंना येथेही दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यात्रेकरूंसाठी पाण्याची व्यवस्था म्हणून चंद्रपूर महापालिकेने केवळ चार टँकर्स तसेच अग्निशमन दलाच्या तीन गाडय़ा लावल्याने दररोज दर्शन घेणाऱ्या ३० ते ३५ हजार भाविकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
महाराष्ट्रातील कोटय़वधी भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या महाकालीच्या यात्रेला चंद्रपुरात गेल्या १५ एप्रिलपासून सुरुवात झाली. बुधवार व गुरुवार देवीच्या यात्रेचे मुख्य दिवस असल्याने भाविकांची अलोट गर्दी लोटली आहे. यावर्षी पाणी टंचाई व दुष्काळी परिस्थिती असल्याने मराठवाडय़ातील लाखो भाविक यात्रेत सहभागी होण्यासाठी चंद्रपुरात दाखल झाले आहेत. त्यांना गैरसोयीचा तसेच पाण्याच्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
दुष्काळापासून काही दिवस दूर राहावे म्हणून भाविक येथे आले, परंतु मंदिर व्यवस्थापन व महापालिकेने पिण्याच्या पाण्याची तसेच स्नान व शौचालयासाठीही व्यवस्था न केल्याने येथेही दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यात्रेसाठी दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातील लातूर, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, कोल्हापूर, यवतमाळ, वर्धा, आंध्रप्रदेश आदी ठिकाणाहून मोठय़ा संख्येत भाविक सहकुटुंब आले आहेत. मागील दहा दिवसात दीड लाखावर भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे. या वर्षी महापालिकेने २५ लक्ष निधी यात्रेसाठी दिला आहे. असे असतानाही परिसरात मात्र सुविधांचा अभाव दिसून येत आहे.
यात्रा सुरू होण्यापुर्वी परिसरात योग्य सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते पण वास्तविक सुविधांचा अभाव आहे. यात्रेकरूंनी यंदा भक्त महाकाली मंदिराच्या बाहेर, धर्मशाळा, महाकाली पटांगण, गुरूमाऊली, गौतम नगर या ठिकाणी मुक्काम ठोकला आहे. यावेळी परिसरात बाहेर गावातून येणाऱ्या भक्तांनी गर्दी आहे. या परिसरात भक्तांसाठी मंदिर व नगर प्रशासनाकडून सुविधा पुरवल्या आल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात अशी कुठलीही व्यवस्था येथे उपलब्ध नसल्याचे प्रतिनिधीला दिसले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र पूर्ण परिसरात फक्त दोनच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज ३० ते ३५ हजार भाविक दर्शनाला येत असताना केवळ चार टँकर व तीन अग्निशमन दलाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे परिसरात डोक्यावरून माठात पाणी घेऊन जाणारे अनेक भक्त दिसतात.
महापालिकेचे यात्रा प्रमुख शहर अभियंता खोब्रागडे यांना विचारणा केली असता चार टँकर पुरेसे असल्याचा दावा त्यांनी केला. यासोबतच ५० शौचालये व ५० स्नानगृहे बैल बाजार परिसरात यात्रेकरूंसाठी तयार केले आहेत. परंतु, त्या परिसरात अस्वच्छता असल्याने यात्रेकरू तेथे स्नान करीत नसल्याची माहिती यात्रेकरूंनी ‘लोकसत्ता’ला दिली. अंघोळीसाठी झरपट नदीवर यात्रेकरूंची व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरात सर्वत्र घाण आहे. कपडे बदलण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. परिसरात मंडप उभारण्यात आले आहे परंतु हे मंडप वाऱ्या, पाण्यापासून भक्तांचा बचाव करण्यास असमर्थ आहे. या सुविधांच्या अभावामुळे भक्तांची गैरसोय होत आहे. यात्रेकरू स्नान व शौच्छासाठी शहरातील रस्त्यांवर भटकताना दिसतात. भक्तांसाठी सर्व सुविधा पुरविल्याचा दावा मंदिर व्यवस्थापनाने केला आहे.