शाळेच्या पहिल्याच दिवसापासून सर्व इयत्तांची पुस्तके उपलब्ध करून देण्याचा शिक्षण विभागाचा दावा फोल ठरणार असून अनेक विद्यार्थ्यांचे दफ्तरे रितेच राहण्याची शक्यता बळावली आहे. दरवर्षीप्रमाणे उद्या, २६ जूनला विदर्भात महापालिका शाळांसह राज्य मंडळाच्या सर्वच शाळा उघडणार आहेत.
इयत्ता पहिली आणि दुसरीच्या सुमारे २० ते २५ टक्के पुस्तकांची छपाई पूर्ण  झाल्याने शाळा सुरू झाल्यावर किंवा त्यानंतर काही दिवस तर सर्व मुलांना पुस्तके मिळणे अशक्य आहे. त्यामुळे काहींना पुस्तके मिळतील काही विद्यार्थ्यांना पुस्तके मिळेपर्यंत रिकामे दफ्तर घेऊनच घरी जावे लागेल. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी पहिली ते आठपर्यंत नि:शुल्क पुस्तके दिली जातात. मात्र यावेळी पहिली व दुसरीच्या पुस्तकांची छपाईच होऊ शकलेली नाही.
मंडळाच्या सर्वच शाळा येत्या २६ जूनला उघडणार आहेत. शाळा सुरू व्हायला जेमतेम एक दिवसाचा अवधी उरला आहे. मात्र बालगोपालांना पुस्तके आणि त्यातील आकर्षक, छानछान चित्र पाहण्याची, वाचण्याची संधीच मिळणार नसल्याने त्यांची नाराजी ओढवण्याची शक्यता आहे. राज्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विषयांचा अभ्यासक्रम राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत (एमसीईआरटी) तयार केला जातो. तर नववी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य मंडळामार्फत तयार करण्यात येतो. या पुस्तकांचे छपाईचे काम पाठय़पुस्तक महामंडळ म्हणजे बालभारती करते. यावेळी पहिली व दुसरीच्या इयत्तेच्या पाठय़क्रमात बदल करण्यात आला आहे. बदलामुळेच पुस्तकांच्या छपाईचे काम रखडले आहे. पुस्तकांतील बदलानंतर बालभारतीकडे पुस्तके छपाईसाठी आल्याने साहजिकच छपाईसाठी बालभारतीला पाहिजे तेवढा वेळ मिळू शकला नाही. पर्यायाने २६ जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके पडण्याची सुतराम शक्यता नाही.
मराठी माध्यमाच्या पहिली ते तिसरी इयत्तेतील गणित-एक या पुस्तकाची पूर्ण छपाई होऊ शकली. जिल्हा परिषदेतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहा-सात तालुक्यांमध्ये सर्वच पुस्तके पाठवता आलेली नाहीत. पाठय़पुस्तक महामंडळाच्या माहितीनुसार विभागातील सर्वच जिल्ह्य़ांत ९० टक्के पुस्तके पोहोचवण्यात आली आहे. मात्र महापालिका शाळांमध्ये त्यापेक्षा कमी संख्येने पुस्तकांचे वाटप झालेले आहे. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना देखील पुस्तकांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

विदर्भातील शाळांची पहिली घंटा आज
उन्हाळय़ाच्या जवळपास दीड महिन्याच्या सुट्टीनंतर उद्या, बुधवार महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना प्रारंभ होणार आहे. पहिल्या दिवशी कुठल्याही शिक्षकांनी अनुपस्थित न राहता विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करावे, असे आदेश जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा उपराजधानीत येणार असून शहरातील काही शाळांना भेटी देणार आहेत.
यावर्षी महापालिका शाळांची रंगगंगोटी करण्यात आली असून जवळपास सर्वच सज्ज असून शाळेतील पिण्याची पाण्याची व्यवस्था, शौचालये, टेबल आदी साहित्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थित राहावी यासाठी शिक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळादेखील उद्यापासून सुरू होणार असून कुठल्याही शिक्षकांनी अनुपस्थित राहू नये आणि राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे शिक्षण उपसंचालक महेश करजगावकर यांनी सांगितले. शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा उद्या सकाळी नागपुरात येणार असून ते काही शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार असल्याचे करजगावकर म्हणाले.