आपुलकीची माणसं आणि आपुलकीचे शब्द यांना आसुसलेल्या आजी-आजोबांसमवेत दिवाळी साजरी करत महावीर महाविद्यालयातील सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी युनिटच्या छात्रसैनिक विद्यार्थिनींनी रविवारी चंबुखडी येथील सिद्धाई महिला मंडळ ट्रस्ट संचलित मातोश्री वृद्धाश्रमातील रहिवाशांच्या डोळय़ांमधील स्नेहज्योतींना नव्याने उजाळा दिला.
सहयोगी एनसीसी अधिकारी मेजर डॉ. रूपा शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या छात्रसैनिकांनी या वर्षी चंबुखडी येथे मातोश्री वृद्धाश्रमाला आपलंसं करीत ५० आजी-आजोबांना घरचा फराळ मायेने भरवून त्यांना रांगोळय़ा, आकाशकंदील, फुलबाजे, पणत्या यांचाही आनंद देत नातवंडांच्या भेटीचा प्रत्यय दिला. साहजिकच आजी-आजोबांच्या डोळय़ांत स्नेहज्योती उमळल्या. काजल भोसले या छात्रसैनिक विद्यार्थिनीच्या आईने मुद्दाम पाठविलेली साडी आरोग्य खात्यातून निवृत्त झालेल्या कुसुमताईंना देण्यात आली.
वृद्धाश्रमाच्या प्रमुख वैशाली राजशेखर यांनी छात्रसैनिकांचे अगत्याने स्वागत करून वृद्धाश्रमाविषयी माहिती दिली. तर मेजर प्रा. डॉ. रूपा शहा यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. वृद्धाश्रमातील रहिवाशी राजेश्वर कडगे (लातूर) तसेच कागलच्या कुंदा कुलकर्णी यांनी उपक्रमाबाबतच्या वृद्धांच्या भावनांना शब्दरूप दिले.  अखेरीस छात्रसैनिकांच्या वतीने राजश्री पाटील हिने सर्वाचे आभार मानले. उपक्रम यशस्वी करण्यात तेजस्विनी आरगे, किरण चौगुले, पूनम सुतार, विद्या उपाध्ये व भाग्यश्री डोरले आदी छात्रसैनिकांचा पुढाकार होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजीराव कणसे व कमांडिंग ऑफिसर कर्नल अरविंद शेट्टी यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.