नवी दिल्लीतील सामुहिक बलात्कार प्रकरणातील संशयितांना त्वरीत शिक्षा द्यावी, वाशिम जिल्ह्यातील पिडीत अंध बालिकेच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी शासनाने स्वीकारावी, यांसह इतर मागण्यांसाठी येथे सोमवारी युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सकाळी कॅनडा कॉर्नरपासून काढण्यात आलेल्या या मोर्चात मराठा विद्या प्रसारक समाज संचलित मराठा हायस्कूलमधील विद्यार्थिनींसह राष्ट्रीय दृष्टिहीन संघ संस्थेतील अंध विद्यार्थिनी सामील होत्या. मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात निवेदन देण्यात आले. महिलांसाठी कितीही कायदे करण्यात आले तरी, त्यांची अमलबजावणी योग्य पध्दतीने होत नाही तोपर्यंत त्यांचा काहीही उपयोग नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. केवळ मोर्चा काढून समाजात परिवर्तन होईल असे नाही. समाजाचे उद्बोधन व व्यवस्थेमध्ये परिवर्तन होण्याची आवश्यकता आहे. महिलांसाठी असलेल्या सर्व कायद्यांची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. दिल्ली किंवा वाशिमप्रमाणे देशाच्या कानाकोपऱ्यात रोज अशा घटना घडत असतात. त्यापैकी केवळ एखाद्यावेळी जनतेत उद्रेक होतो. इतरवेळी जनता निद्रिस्तच असते, हा समज बदलण्याची वेळ आली आहे. महिलांवरील अत्याचाराचे खटले चालविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र न्यायालय स्थापन करावे, अशा गुन्ह्यांचा निकाल वर्षभरात लावावा, बलात्कार प्रकरणात दयेचा अर्ज करण्याची मुभा नसावी, अशा मागण्या युवतींकडून पुढे आल्याचे युनिटीचे संजय भूतडा यांनी सांगितले. महिलांनीही मोबाईल सतत जवळ बाळगणे, प्रवास करताना वडिलाधाऱ्यांना त्याविषयी कल्पना देणे, वाहनाचा नंबर एसएमएसने कळविणे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.