सावेडी व केडगाव भुयारी गटार योजनेचे सुधारीत प्रस्तावांना तसेच वाढीव खर्चाला मान्यता घेण्यासाठी महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा उद्या (दि.३०) होत आहे. राज्य सरकारच्या सूचनेवरून ही विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या समितीची तसेच नंतर नगरविकास मंत्रालयाचीही अंतिम मान्यता या तब्बल १८२ कोटी ८२ लाख रूपयांच्या योजनांना मिळाली आहे. मात्र मनपाने दोन्ही योजनांचे सध्याच्या दरसूचीनुसार सुधारित प्रस्ताव सादर केले होते. सर्वसाधारण सभेत पूर्वी मंजूर झालेला प्रस्ताव व नवा प्रस्ताव यात फरक होता. तसेच केडगावसाठीची पूर्ण योजनाच मनपाने नव्याने दिली होती.त्यामुळे या दोन्हीला तसेच वाढीव खर्चाला सर्वसाधारण सभेची मान्यता लागेल असे संबधित विभागाने आयुक्त विजय कुलकर्णी यांना कळवले. त्यांनी लगेचच महापौर शीला शिंदे यांना सांगून त्याप्रमाणे सभा आयोजित केली. आता सभेतील मान्यतेनंतर हे दोन्ही प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारच्या संबधित विभागाकडे जातील.