यंत्रमाग कामगारांना ५२ पिकाला ८७ पैसे मजुरी आणि १६.६६ टक्के बोनस दिवाळी सानुग्रह अनुदान असा मजुरीवाढीचा तोडगा बैठकीत मान्य झाला. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांची शिष्टाई सफल ठरली. मजुरीवाढीच्या या तोडग्यामुळे तब्बल ३८ दिवसांपासून इचलकरंजीतील बंद असलेला यंत्रमागाचा खडखडाट आता पुन्हा सुरू होणार आहे.
मजुरीवाढप्रश्नी निर्णयासाठी मंत्री मुश्रीफ यांनी विश्रामगृहात बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, कामगार आयुक्त आर. आर. हेंद्रे, प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, धनपाल टारे, सहायक कामगार आयुक्त बी. डी. गुजर यांच्यासमवेत यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनिधी सतीश कोष्टी, विनय महाजन, विश्वनाथ मेटे, दीपक राशिनकर, सचिन हुक्किरे, सागर चाळके, राजगोंडा पाटील, राहुल निमणकर, मदन झोरे, कामगार संघटनांचे प्रतिनिधी कॉ. दत्ता माने, मिश्रीलाल जाजू, श्यामराव कुलकर्णी, भरमा कांबळे, राजेंद्र निकम, सचिन खोंद्रे आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुश्रीफ यांनी दोन्ही संघटनांच्या प्रतिनिधींशी स्वतंत्रपणे चर्चा केली. चर्चेच्या पहिल्या टप्प्यात यंत्रमागधारक १६.६६ टक्के बोनस या मुद्यावर तर कामगार संघटना गतवर्षीच्या बोनसइतकी रक्कम मिळावी यावर ठाम होते. त्यावर चर्चेच्या फेऱ्या झाल्या. अखेरीस कामगार मंत्र्यांनी जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी प्रस्ताव दिलेल्या ८५ पैसे मजुरीत आणखी २ पैशांची वाढ करून १६.६६ टक्के सानुग्रह अनुदान हा नवा प्रस्ताव ठेवून त्याला कामगार आणि यंत्रमागधारक संघटनांची मान्यता घेतली. दोन्ही संघटनांच्या वतीने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. या निर्णयामुळे कामगाराला वार्षिक साधारणत: २८००० रुपयांची पगार वाढ मिळणार आहे. तर कारखानदारांवर वार्षिक ९ कोटी रुपयांचा बोजा सोसावा लागणार आहे.
यानंतर पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, या तोडग्यामुळे कामगारांच्या पगारात भरघोस अशी वाढ झाली आहे. तर इचलकरंजीतील मजुरीवाढीसाठीचे आंदोलन कायमपणे संपावे यासाठी येत्या काही दिवसांत वाढत्या महागाई निर्देशांकानुसार मजुरीत वाढ होत जाणार आहे.
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी इतिहासातील उच्चांकी वाढ यानिमित्ताने कामगारांच्या पदरात पडली आहे. भविष्यात वस्त्रोद्योगातील औद्योगिक शांतता कायम राहण्यासाठी आवाडे समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी आपण पाठपुरावा करू. त्यामध्ये जर त्रुटी असतील तर दूर कराव्यात असेही सांगितले.
कामगार नेते कॉ. माने व कुलकर्णी यांनी या आंदोलनात बोनस प्रश्नावर दोन पावले कृती समितीला मागे यावे लागले असले तरी वस्त्रोद्योगाचा खडखडाट पुन्हा सुरू करण्यासाठी ते गरजेचे होते. मजुरीवाढीच्या रूपाने आज सर्वोच्च वाढ कामगारांना मिळाली आहे. त्यावर आम्ही समाधानी आहोत. कामगारांच्या अन्य मागण्यांसाठी कृती समितीच्या माध्यमातून आपण लढत राहू असे सांगितले.