अस्तित्त्व नसलेल्या बाबींना प्राधान्य दिल्याने अंधश्रद्धा बळावते. मेंदूत साठवलेल्या या अंधश्रद्धेला जोपर्यंत मूठमाती देत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे यांनी केले.
देहदान समितीतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) आयपीए सभागृहात देहदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे होते. देहदान चळवळीचे कार्यकर्ते चंद्रकांत मेहर, रमेश सातपुते, त्र्यंबक बांदरे, मेडिकलमधील क्ष-किरण विभाग प्रमुख किशोर टावरी, शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. मीना मेश्राम, अधीक्षक डॉ. जे. बी. हेडाऊ, माजी अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे प्रामुख्याने उपस्थित होते.
धर्मात सांगितलेले कर्मकांड, अस्तित्वात नसलेला आत्मा, वाईट रुढी, परंपरेचा खरपूस समाचार घेतना चौबे म्हणाले, अंधश्रद्धेचे पीक डोक्यात जन्माला येण्यापूर्वीच प्रत्येक प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक माहिती दिली पाहिजे. त्यांना मानवाच्या शरीर रचनेची माहिती दिली पाहिजे. ही माहिती दिली तरच अनेक समस्येतून आपोआपच मुक्ती मिळेल. परंतु वैज्ञानिक युगात जगत असताना कुटुंबातील सदस्य व समाज अंधश्रद्धा निर्माण होईल, अशा बाबी लहान मुलांच्या मेंदूवर बिंबवतात. अशापद्धतीने निर्माण झालेल्या अंधश्रद्धाळू मेंदूमुळे समाजाचा विकास होऊ शकत नाही. समाजाची सर्वागीण प्रगती करायची असेल तर त्यासाठी मानसिकता बदलवण्याची खरी गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या काळात देहदानाची फार आवश्यकता असून परंपरा तोडून सर्वानीच पुढे येण्याची गरज असल्याचे मत डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी व्यक्त केले. एकवीसाव्या शतकात जगत असताना काय योग्य आणि काय अयोग्य याची जाण आलीच पाहिजे. आज पृथ्वीवर विषाणू अनेक आजाराच्या रूपात प्रगट होत आहेत. वैद्यकीय क्षेत्रासमोर हेच मोठे आव्हान असताना त्यात अंधश्रद्धेसारखे दुसरे आव्हानही उभे ठाकले असल्याचेही ते म्हणाले. रमेश सातपुते यांनी धर्मकांड आणि कर्मकांड यांची उदाहरणे देऊन देहदानाचे महत्त्व विशद केले. तर चंद्रकांत मेहर यांनी देहदानाच्या चळवळीवर प्रकाश टाकून देहदानासाठी प्रसार आणि प्रचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. मेडिकलमधील शरीररचना शास्त्र विभाग प्रमुख डॉ. मीना मेश्राम यांनी प्रास्ताविकातून देहदान म्हणजे काय? देहदान कोण करू शकतो? याची माहिती सांगून मृतदेह वैद्यकीय अभ्यासासाठी आवश्यक कसे आहे, हे स्पष्ट केले.
कार्यक्रमास डॉ. अरुण कसोटे, डॉ. नामदेव कामडी, डॉ. तृप्ती बलवीर, डॉ. तारकेश्वर गोडघाटे, डॉ. हेमलता अंबादे, डॉ. शिल्पा सोनारे यांच्यासह देहदान चळवळीतील कार्यकर्ते, मेडिकलमधील विविध विभागाचे डॉक्टर्स, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.