कयाकिंग, कॅनाईंगसाठी नद्यांचे सर्वेक्षण
‘वल्हव रे नाखवा हो..’ ‘नाविका रे वारा वाहे रे..’ दोन्ही लोकप्रिय गाण्यांमधून अथांग समुद्र आणि समुद्राच्या पाण्यातून नाव वल्हवणारा नाविक डोळ्यांपुढे उभा राहतो.. केरळात प्रामुख्याने दिसणारे हे चित्र आता विदर्भात दिसू लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.. विदर्भातील नद्या, कालवे, तलाव आणि धरणांची संख्या लक्षात घेऊन कयाकिंग आणि कॅनॉईंग या जलक्रीडा प्रकारांची एन्ट्री लवकरच होऊ घातली आहे. कयाकिंग, रोईंग आणि कॅनाईंगचे आंतरराष्ट्रीय ज्युरी व माजी राष्ट्रीय खेळाडू दत्ता पाटील यांनी नुकतीच विदर्भातील जलप्रकल्पांची पाहणी करून यासंदर्भात अनुकूल मत नोंदविल्याने भविष्यात विदर्भातील जलप्रकल्पांमध्ये होडय़ांच्या शर्यती आणि शिडाच्या नावांचा थरार अनुभवावयास मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
ऑलिम्पिक स्पर्धामध्ये कयाकिंग आणि कॅनाईंगचा समावेश असल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार करण्याच्या दृष्टीनेही हा जलक्रीडा प्रकार अत्यंत उपयुक्त ठरणार असून मराठवाडय़ाचा पट्टा आणि सांगली, सातारा, कोल्हापूर शहरांमध्ये याचे भयंकर वेड आहे. मराठवाडय़ातील बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्य़ांमध्ये हा जलक्रीडा प्रकार प्रचंड लोकप्रिय झाला आहे. विदर्भातील तलाव आणि नद्यांचे प्रमाण लक्षात घेता याची पायाभरणी अद्याप झालेली नाही. नौदल युनिटच्या छात्रसैनिकांपुरताच हा खेळ मर्यादित आहे. याचे भविष्यातील महत्त्व लक्षात घेता नद्या आणि तलावांमध्ये कयाकिंग आणि कॅनाईंगचे धडे देण्यासाठी पथके तैनात केली जाणार आहेत. पर्यटन आणि साहस एवढय़ापुरतेच प्रशिक्षण मर्यादित न ठेवता स्पर्धा पातळीवर विदर्भातील तरुण-तरुणींना प्रशिक्षित करण्याचा मानस असल्याचे दत्ता पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
सैन्यदले, निमलष्करी दले आणि पोलीस दलातही कयाकिंग, रोईंग आणि कॅनॉईंगची स्वतंत्र पथके आहेत. ऑलिम्पिकमध्ये भारताला पदकही प्राप्त झाले आहे. विदर्भाची जलक्रीडा मात्र अद्यापही पायडल बोट पुरतीच मर्यादित असून यात पुढे काहीही प्रगती झालेली नाही. रामटेकमधील खिंडसीचा तलाव भारताच्या जलक्रीडा केंद्रांच्या नकाशावर आहे. येथे होडय़ांच्या जुजबी शर्यती घेण्याचे प्रयत्नही झाले. मात्र, स्पर्धात्मक दृष्टय़ा हा क्रीडाप्रकार रुजविण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. विद्यापीठ स्पर्धामध्ये कयाकिंग आणि कॅनाईंगचा समावेश आहे. पण, यासाठी लागणारे प्रचंड परिश्रम, द्यावा लागणारा वेळ आणि महागडय़ा उपकरणांची उपलब्धता हे सर्वात प्रमुख अडसर आहेत. कॅनाईंग, कयाकिंग आणि रोईंग या जलक्रीडा प्रकारांना हवे असलेले तलाव, कालवे आणि नद्या विदर्भात मुबलक प्रमाणात असल्याने स्पर्धात्मक पातळीवर दर्जेदार खेळाडू तयार होणे कठीण नाही, अशी आशा दत्ता पाटील यांनी व्यक्त केली. दत्ता पाटील हे १९९५ च्या काळात राष्ट्रीय पातळीवरील कयाकिंग आणि कॅनाईंग स्पर्धेत महाराष्ट्रात चमकत होते. आता त्यांनी खेळाच्या प्रसार आणि प्रचाराला वाहून घेतले आहे. दत्ता पाटील यांचे गुरू प्रताप जामदार यांचे नाव या क्षेत्रात आदराने घेतले जाते. त्यांनीही हा खेळ महाराष्ट्रात रुजविण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले आहेत.
कयाकिंग, कॅनाईंगची महाराष्ट्रातील सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली याचा दाखला देऊन पाटील म्हणाले, हा खेळ सैन्यदलातील वरिष्ठ हुद्दय़ाचेअधिकारी खेळायचे. मात्र, तो आता सर्वासाठी खुला झाला आहे. नौदल आणि तटरक्षक दलांत याचे विशेष महत्त्व आहे. आपत्ती व्यवस्थापनात कयाकिंग आणि कॅनाईंगचे जाणकार प्रचंड मोलाची भूमिका बजावत आहेत. हा खेळ शिकण्यासाठी पोहणे येणे आवश्यक आहे, त्यानंतर शारीरिक तंदुरुस्ती सर्वात महत्त्वाची ठरते. महिनोंमहिने सराव केल्यानंतर वल्हे फिरवण्याची कला शिकता येते, यातूनच स्पर्धेत भाग घेऊन विजेतेपद पटकावता येते. आजही भर पावसाळ्यात नद्यांच्या प्रवाहाच्या उलट दिशेने जाण्याचे जलक्रीडा प्रकार प्रचलित आहेत. विदर्भात असे आढळलेले नाही. या खेळाविषयी जागरुकता नसल्याने तसे घडले असेलही पण सतत पाण्याशी संपर्क येणाऱ्या मच्छिमारांच्या मुलांसाठी या खेळातून मोठे करिअर करण्याची संधी निश्चितच आहे.

श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार