ताप, थंडी, सर्दी, सुका खोकला यांसारख्या आजारांनी नवी मुंबईत चांगलीच उचल खाल्ली आहे. स्वाइन प्लूचे पाच, तर ताप, सर्दी, खोकल्याचे १७०० रुग्ण आढळले आहेत. पालिकेच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची गर्दी वाढली असून रुग्णालयांना जागा अपुरी पडू लागली आहे. पालिकेच्या सर्वात मोठय़ा रुग्णालयांची ही स्थिती असून खासगी रुग्णालयात तर रुग्ण प्रतीक्षा यादीवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दीडशे खासगी रुग्णालयांच्या या शहरात दोन हजारपेक्षा जास्त रुग्ण या साथीच्या आजारांनी दाखल असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सर्वच रुग्णांना एचवन, एनवन रक्ताची तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहे. या तपासणीसाठी ८०० रुपये खर्च येत असल्याने रक्त तपासणी करणाऱ्या केंद्रांचं मात्र चांगभलं झालं आहे.
श्रावण महिन्यात सुरू झालेला उन्ह-पावसाचा खेळ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा ठरला आहे. वातावरणात होणाऱ्या या अचानक बदलाचे परिणाम शरीरावर होत असून थंडी, ताप, सर्दी, सुका खोकला आणि अशक्तपणा यामुळे नागरिक बेजार होऊ लागले आहेत. दोन चार दिवस जुजबी औषधाने अंगावर काढल्यानंतर तापाचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशीचे प्रमाण कमी होत असल्याचे डॉक्टर संदीप मेस्त्री यांनी सांगितले. ह्य़ा पेशी वाढण्याची गरज असून त्या कमी झाल्यास रुग्णाच्या जीविताला धोका पोहचू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई पालिकेच्या वाशी येथील मध्यवर्ती रुग्णालयात या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत झपाटय़ाने वाढली असून बाह्य़ रुग्ण विभागात एक हजार ७०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयाची क्षमता ३०० खाटांची असताना ३२५ रुग्णांना दाखल करून घेण्यात आले आहे. यात स्वाइन प्लूचे पाच रुग्ण आढळून आल्याचे रुग्णालयीन अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे यांनी सांगितले. दाखल झालेल्या रुग्णात मलेरिया, डेंग्यू यांचेही रुग्ण असल्याने रक्त तपासणी मोठय़ा प्रमाणात केली जात आहे. खासगी रक्त तपासणी केंद्रावर त्यामुळे सकाळ-संध्याकाळ रुग्णांची रक्त तपासणी नमुने देण्यास एकच गर्दी होत आहे. याचा फायदा काही केंद्रांनी उचलण्यास सुरुवात केली असून एचवन, एनवन, डेंगी, मलेरिया तपासणीसाठी एका लहान मुलगी असलेल्या रुग्णाकडून ऐरोलीतील केंद्राने १७०० रुपये घेतले आहेत. संधीचे सोने करण्यात पटाईत असणाऱ्या या केंद्रांनी डॉक्टरांना कट प्रॅक्टिसची सवय लावल्यामुळे बहुतांशी डॉक्टर या तपासणी करण्याचा आग्रह करीत आहेत.
शहरात साथीच्या आजारांचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहेत. त्यात स्वाइन फ्लू, मलेरिया, डेंगी यांचे रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संशयित रुग्णांनी रक्त तपासणी करून घेणे योग्य आहे. अतिसार, उलटय़ा, श्वसनाचा त्रास, खोकला, ताप, घसा दुखणे ही स्वाईन फ्लूची लक्षणे आहेत. अशावेळी सार्वजनिक ठिकाणी जाणे रुग्णांनी टाळावे, हात स्वच्छ धुणे, खोकताना रुमाल वापरणे, पुरेशी झोप आणि पौष्टिक आहार अशा उपाययोजनामुळे स्वाइन फ्लू आटोक्यात येऊ शकतो. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे. डेंगी आणि मलेरियाला आटोक्यात ठेवण्यासाठी घरात स्वच्छ पाणी साचू न देणे हा सर्वोत्तम उपाय आहे. वातावरणातील बदलामुळे ही रुग्ण संख्या वाढली आहे.
-डॉ. दत्ता सोनावणे, नवी मुंबई

पनवेलमध्ये स्वाइन फ्ल्यूचा पहिला बळी

पनवेलमध्ये ‘स्वाइन फ्ल्यू’ मोठय़ा प्रमाणात फैलावला आहे. कामोठे येथे एक वर्षे वयाच्या एका बालिकेचा स्वाइन फ्ल्यूने मृत्यू झाला. तालुक्यात हा स्वाइन फ्ल्यूचा पहिला बळी ठरला असून नागरिकांनी या आजाराबाबत चिंता व्यक्त केली आहे.
पनवेल तालुक्यामध्ये स्वाइन फ्ल्यूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यामध्ये आतापर्यंत स्वाइन फ्ल्यूचे १९ संशयित रुग्ण आढळले आहेत. या सर्वाची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. श्रीवर्धन येथील दिघी येथे राहणारी शुभांगी मोहन अंबाजी या एक वर्षे वयाच्या बालिकेला स्वाइन फ्ल्यू झाल्याचा संशय आल्यावर तिला कामोठे येथे एमजीएम रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आठवडाभर तिच्यावर उपचार सुरू होते, परंतु आजार अधिक प्रमाणात बळावल्याने तिचा मृत्यू झाला. स्वाइन फ्ल्यूची सर्वाधिक संशयित रुग्ण पनवेल शहरासह खारघर वसाहतीमध्ये आढळले आहेत. तालुक्यामधील राजकीय व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन नागरिकांना स्वाइन फ्ल्यूबाबत घ्यावयाची काळजी याविषयीचे कार्यक्रम करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. मास्क वाटून या आजारावर नियंत्रण मिळविता येत नसल्याने सर्दी-खोकला असणाऱ्या रुग्णांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, अशा सूचना डॉक्टरांकडून केल्या जात आहेत. आरोग्य विभाग व सामाजिक संघटना आरोग्याची काळजी घेण्यासाठी लवकरच शहरांच्या चौकाचौकांमध्ये पथनाटय़ करणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. रहिवाशांनी घाबरून न जाता आरोग्याच्या सतर्कतेच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यास स्वाइन फ्ल्यूसारख्या सामाजिक समस्येवर नियंत्रण मिळविता येईल, असे आवाहन पनवेल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बस्वराज लोहारे यांनी केले आहे.