विद्यार्थी आणि शिक्षकांची रोजच्या रोज ऑनलाइन हजेरी नोंदविण्याच्या ‘शालेय शिक्षण विभागा’च्या आदेशाचा वेगळाच त्रास शिक्षकांना होऊ लागला आहे. या आदेशान्वये दुपारी दोन वाजेपर्यंत हजेरी नोंदवायची असल्याने कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांना त्यांचे वर्ग भलेही उशीरा सुरू होणार असो, हजेरी नोंदविण्यासाठी महाविद्यालयात दुपारी एकपर्यंत हजेरी लावावी लागणार आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांना ही दोनपर्यंत नोंदणी करण्याची सक्ती तापदायक वाटते आहे.
पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना या शैक्षणिक वर्षांपासून दररोजची विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती ऑनलाइन नोंदविण्याची सक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची बोगस नोंदणी थांबविण्यासाठी ही सक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थी, शिक्षकांच्या रोजच्या उपस्थितीचा आढावा घेऊन दोन वाजण्याच्या आधी उपस्थितीचा अहवाल ऑनलाइन नोंदवायचा आहे.
शाळा शिक्षकांसाठी हा नियम ठीक आहे. पण, कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग दुपारी उशीरा सुरू होतात. या वर्गानुसार शिक्षक महाविद्यालयात हजेरी लावतात. म्हणजे पहिला वर्ग दुपारी दोनला असेल तर शिक्षक त्या वेळेस महाविद्यालयात येतात. पण, आता दुपारी दोनपर्यंत हजेरी लावणे बंधनकारक झाल्याने कोणत्याही परिस्थितीत दुपारी एक किंवा जास्तीत जास्त दीड वाजेपर्यंत महाविद्यालयात येणे शिक्षकांना क्रमप्राप्त होणार आहे.
‘आमचे वर्ग मुळातच उशीरा सुरू होतात. वर्ग उशीरा सुरू झाल्याने आम्ही सायंकाळी सहा तर कधी सातपर्यंत महाविद्यालयात थांबतो. दुपारी दोनपर्यंत हजेरी नोंदविण्याच्या सक्तीमुळे आम्हाला दुपारी एकपर्यंत महाविद्यालयात यावे लागणार आहे,’ अशी तक्रार एका शिक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर केली. ‘कित्येकदा ऑनलाइन नोंदणीसाठी दिलेले संकेतस्थळ चालत नाही. त्यामुळे नोंदणी करायला गेलो तर त्यात आमचा बराच वेळ जातो,’ असा तक्रारीचा सूर एका प्राचार्यानी लावला.

व्यावहारिक अडचण
हजेरीचा अहवाल नोंदविण्याच्या नियमावर आमचा आक्षेप नाही. परंतु, कनिष्ठ महाविद्यालये तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये (पाळी) चालतात. दुपारी किंवा सायंकाळच्या शिफ्टमध्ये चालणाऱ्या महाविद्यालयांना दुपारी दोनपर्यंत हजेरीचा अहवाल नोंदविणे व्यावहारिकदृष्टय़ा शक्य नाही. त्यामुळे, कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ही वेळ थोडी वाढवून देण्यात यावी.
अनिल देशमुख, सरचिटणीस, महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ