निवडणुकीत मतांचे दान मागत मतदारांपुढे लीन होणाऱ्या ठाणे, कल्याणमधील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शन करण्याच्या नादात नागरिकांचे हाल करण्याचा सिलसिला कायम ठेवला आहे. कल्याणात सुमारे २० हजारांहून अधिक कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन घडवीत उल्हासनगरवासियांची वाट अडविण्याचे शिवसेना नेत्यांचे प्रताप अगदी ताजे असतानाच शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाण्यातील उमेदवार संजीव नाईक यांची निवडणूक रॅली येथील नागरिकांसाठी मनस्ताप देणारी ठरली. पाचपखाडी येथील नितीन कंपनी ते महापालिका मुख्यालयापर्यंतचा अतिशय वर्दळीचा रस्त्यावर ढोल-ताशांच्या गजरात नाईक यांनी हजारो समर्थकांसह मिरवणूक काढली. रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो. असे असताना महामार्गापासून भलीमोठी रॅली निघाल्याने वाहतूक कोंडीत सापडलेले सर्वसामान्य ठाणेकर या शिक्तप्रदर्शनाच्या नावाने अक्षरश खडे फोडताना दिसत होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही हरिनिवास, तीन पेट्रोल पंप, जांभळीनाका अशा अति महत्त्वाच्या रस्त्यांवर मोटारसायकल तसेच रिक्षांची रॅली काढून हा मनस्ताप आणखी वाढविला. साधारणपणे दुपारी १२ ते १ ही वेळ शाळेतून घरी परतणाऱ्या आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असते. बहुतेक विद्यार्थी बस तसेच रिक्षामधून शाळेचा प्रवास करत असतात. राष्ट्रवादी आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या मिरवणुकांमुळे शहरात वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. त्यामुळे ऐन शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांची वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचे चित्र दिसून आले. कल्याण तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय अटीतटीची होत असून त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत मतदारांचे लक्ष केंद्रित करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. कल्याणमध्ये एकनाथ िशदे यांच्या चिरंजीवासाठी शिवसेनेने २० ते २५ हजार समर्थकांसह भली मोठी मिरवणूक काढून या भागातील नागरिकांचे हाल केले. सलग दुसऱ्या दिवशी ठाण्यातून राजन विचारे यांनीही जांभळी नाका अडवून तेच प्रताप केले.
संजीव नाईक यांच्या समर्थकांनी तर ठाण्यात कहरच केला. पाचपाखाडी ते महापालिका मुख्यालय असा शहरातील सर्वात महत्त्वाचा रस्ता अडवून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मूळ शहराची जागोजागी कोंडी केली. राष्ट्रवादीच्या मिरवणुकीत तरुण ढोल-ताशांच्या तालावर रस्ता अडवून नाचताना दिसत होते. राष्ट्रवादी आणि मनसे अशा दोन्ही पक्षाच्या मिरवणुकीमुळे शहरातील मुख्य अंतर्गत रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबई-नाशिक महामार्गावरील तीन हात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी या जंक्शनवर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. मिरवणुकीनंतर ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ आले होते.