रत्नाकर मतकरी लिखित ‘इन्व्हेस्टमेंट’ या कथासंग्रहातील कथा अस्वस्थ करणाऱ्या आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी शुक्रवारी दादर येथे व्यक्त केले.मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मतकरी यांच्या या कथासंग्रहाचे प्रकाशन झाले. त्या वेळी हट्टंगडी बोलत होत्या. कवी किशोर कदम ऊर्फ सौमित्र, प्रा. सुधा जोशी, स्वत: मतकरी या वेळी उपस्थित होते. या कथा वाचताना आपण त्यात इतके गुंतून जातो की, लगेच आपण दुसऱ्या कथेकडे जाऊ शकत नाही आणि अशी अस्वस्थता प्रत्येक कथा वाचताना जाणवते, असेही हट्टंगडी म्हणाल्या.प्रा. जोशी यांनी सांगितले की, कथासंग्रहातील कथा २१ व्या शतकातील पहिल्या दशकातील घडामोडींवर आधारित वास्तववादी कथा आहेत. नौतिक घसरण, असुरक्षितता, वेगवेगळ्या क्षेत्रातील भ्रष्टाचार, वाहवत जाणाऱ्या व्यक्ती यांच्या या कथा आहेत. तर सौमित्र म्हणाले की, ही एक चित्रकथा असून ‘इन्व्हेस्टमेंट’ हा चित्रपट पाहिल्यानंतर पालक मुलांच्या संगोपनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहतील, असे वाटते. रत्नाकर मतकरी यांचेही या वेळी भाषण झाले. प्रकाशक अशोक कोठावळे यांनी प्रास्ताविक केले.