News Flash

ऐसाईच होगा..

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डान्स बारवरील बंदी तब्बल सात वर्षांनंतर उठणार अशी ब्रेकिंग न्यूज सकाळी सकाळी सर्वच वाहिन्यांवर झळकली, आणि रात्री उशिरा घरी परतलेल्यांचे मोबाईल खणखणू

| July 17, 2013 09:19 am

ऐसाईच होगा..

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डान्स बारवरील बंदी तब्बल सात वर्षांनंतर उठणार अशी ब्रेकिंग न्यूज सकाळी सकाळी सर्वच वाहिन्यांवर झळकली, आणि रात्री उशिरा घरी परतलेल्यांचे मोबाईल खणखणू लागले. एसएमएसचे ट्रॅफिक वाढले, अभिनंदनाच्याही निरोपांची देवाणघेवाण सुरू झाली, आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारी अनेक छायाचित्रेही व्हॉटस अपवरून अनेकांपर्यंत पोहोचली. इतक्या वर्षांनंतर आता डान्सबारमध्ये शिरताना कसलीच धाकधूक नाही, आणि छाप्याची भीतीही नाही, या जाणीवेने अनेकजण सुखावलेदेखील..
नंतर बसगाडय़ांमध्ये आणि लोकल ट्रेनच्या गर्दीतदेखील डान्सबारवरील बंदी उठविल्याच्या बातमीचीच चर्चा होती. हा निर्णय फारसा पचनी पडला नसल्याची नाराजी काही चेहऱ्यांवर स्पष्ट दिसत होती, पण कोर्टाचा निर्णय असल्याने ती व्यक्त करण्यास ते धजावत नव्हते. काही कंपू मात्र भलतेच खुश दिसत होते. मुंबईच्या रात्रींना पुन्हा लाभणारे नवे रंग कसे असतील, याचे रसभरीत अंदाजही बांधले जात होते. एकेकाळी गाजलेले, झगमगणारे डान्सबार आर. आर. पाटील यांच्या आदेशानंतर अचानक अंधारात गेल्याने शेकडो बारबालांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. अनेक बारबालांनी मुंबई सोडली आणि पोटाची खळगी भरण्यासाठी अन्य व्यवसायांना आपलेसे केले. अनेक बारबालांना आखाती देशाचा रस्ता धरला, आणि रात्रीच्या वेळी चालणाऱ्या या संघटित उद्योगाची वाताहात झाली. आता सातआठ वर्षांनंतर हा व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू होणार असल्याने या व्यवसायात नवे रोजगार निर्माण होणार आहेत, अशी खोचक टिप्पणी अशाच एखाद्या प्रवासी कंपूतील कुणीतरी केली, आणि तोंडातला गुटख्याचा तोबरा धावत्या ट्रेनच्या खिडकीतून बाहेर मोकळा करत बाकीच्यांनी त्याला दाद दिली. या निर्णयाबद्दल नापसंतीच्या खुणा चेहऱ्यावर आणलेल्या बाजूच्या प्रवाशांपैकी काहीजण उगीचच बावचळून या कंपूकडे पाहात होते. रोजगाराच्या या मुद्दय़ात वेगळे काय आहे, हेच समजत नसल्याचे नवे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटून गेले.
डान्सबार बंदी लागू झाल्यानंतर पोलिसांची सक्त नजरबंदी सुरू होती. एखाद्या ठिकाणी ‘छमछम’ चालते, असे समजले, तरी तेथे जाऊन टाईमपास करण्याची आणि खिसे रिकामे करण्याची हिंमत होत नसे. रात्र रंगात आलेली असतानाच अचानक पोलिसांच्या छाप्याची खबर यायची, आणि तळघरातल्या चोरवाटेतून चेहरा लपवत बाहेर पडण्याची कसरत करावी लागायची. त्यातूनही कुणीतरी पोलिसांच्या हाती लागायचेच. मग दुसरा सगळा दिवस खराब जायचा. शिवाय खिसाही रिकामा व्हायचा. आता या संकटातून सुटका मिळणार, अशी प्रतिक्रियाही काही शौकिनांमध्ये उमटून गेली. आता राजरोसपणे डान्सबारमध्ये जाता येईल, पैशाची ‘बारिश’ करता येईल, ‘गड्डी’ उडवता येईल, आणि नशील्या रात्रीची रंगतदार छमछम कानात साठवतच रात्री उशीरा घर गाठता येईल, असे मनसुबेही व्यक्त होत होते. पुन्हा आर. आर. पाटील यांनी काही नवा फतवा काढला नाही, तरच हे शक्य आहे, अशी सावध चर्चा सुरू झाली, आणि मसालेदार दुधात माशी पडावी, तसा चर्चेचा सगळा नूरच पालटून गेला..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2013 9:19 am

Web Title: the way it will happen
Next Stories
1 उपनगरीय गाडय़ांना स्वयंचलित दरवाजे व्यवहार्य नाहीत
2 मुंबईच्या कंटूर मॅपिंगला वर्षभराचा विलंब ..
3 मंडईतील गाळ्यांसाठी व्यापाऱ्यांची भाऊगर्दी
Just Now!
X