18 September 2020

News Flash

गेले तपासनीस कुणीकडे..

कामगार संघटनेने अचानक संपाची धमकी दिल्यामुळे बेस्टने घाईगडबडीत रोजंदारीवर साडेतीन हजार चालकांची भरती करून प्रवाशांची तात्पुरती सोय केली खरी, परंतु ही सोय सुखकर प्रवासाच्या मुळावर

| March 7, 2013 02:42 am

कामगार संघटनेने अचानक संपाची धमकी दिल्यामुळे बेस्टने घाईगडबडीत रोजंदारीवर साडेतीन हजार चालकांची भरती करून प्रवाशांची तात्पुरती सोय केली खरी, परंतु ही सोय सुखकर प्रवासाच्या मुळावर आली आहे. एकेकाळी चालक-वाहकांवर बेस्टच्या तिकीट तपासनीसांचा प्रचंड वचक होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून ‘गेले तपासनीस कुणीकडे’ अशी स्थिती आली आहे.
बेस्टच्या २५ आगारांमधून मुंबईच्या कानाकोपऱ्यात बसगाडय़ा सोडल्या जातात. या बसगाडय़ांमधून प्रवाशांना सुखकर आणि सुरक्षित प्रवास घडविण्याची जबाबदारी १३,३३१ चालक आणि १३२८९ वाहकांवर आहे. एकेकाळी या चालक-वाहकांवर बेस्टच्या तिकीट तपासनीसांचा प्रचंड वचक होता. तसेच विनाप्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही त्यांचा धाक होता. परंतु आता हा धाक राहिलेला नाही. काही वर्षांपूर्वी गर्दीच्या वेळी बस थांब्यांवर एक दोन तिकीट तपासनीस दृष्टीस पडायचे. बसगाडय़ांमध्ये मध्येच चढून ते प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी करायचे. त्यामुळे बसचालक, वाहक आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर वचक होता. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये बस थांब्यावर आणि बसमध्ये तिकीट तपासणी करणारे तपासनीस अभावानेच दिसू लागले आहेत. त्यामुळे उद्दाम चालक-वाहक आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे फावले आहे.
बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये ६५१ तिकीट तपासनीस आहेत. प्रवाशांची तिकिटे तपासणे, विनातिकीट अथवा कमी अंतराचे तिकीट घेऊन दूरचा प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करणे, भरारी पथकासोबत कार्यरत राहणे, गर्दीच्या वेळी थांब्यांवर प्रवाशांची रांग लावणे, विशेष बसगाडय़ा पूर्णपणे प्रवाशांनी भरल्यानंतरच सोडणे, नियोजित वेळेपूर्वीच आगारांमध्ये पोहोचणाऱ्या बसगाडय़ांवर लक्ष ठेवणे, उद्दाम वाहकाविरुद्ध प्रवाशांच्या तक्रारी नोंदवून घेणे, पावसाळ्यात सखल भागात पाणी साचल्यानंतर बसगाडय़ा अन्य मार्गाने वळविण्याची चालकांना सूचना करणे, मोर्चे-आंदोलनांमुळे बस अन्य मार्गाने वळविण्यासाठी मार्गदर्शन करणे, तोटय़ात चालणाऱ्या बसमार्गाचे सर्वेक्षण करणे आदी कामांची जबाबदारी मुख्यत्वे तिकीट तपासनीसावर सोपविण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी बेस्टचे तिकीट तपासनीस बसगाडय़ांमध्ये तिकीट तपासताना अथवा बस थांब्यावर प्रवाशांची रांग लावताना दिसत होते. परंतु आता हे अभावानेच दिसचे. तिकीट तपासनीसांची केवळ ४१ पदे रिक्त असल्याचा दावा बेस्ट प्रशासनाने केला आहे. मग हे तिकीट तपासनीस गेले कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2013 2:42 am

Web Title: there are no ticket checkers of best bus in city
टॅग Best Bus,Transport
Next Stories
1 म्हाडाच्या साडेआठशे घरांना बिल्डरांच्या विळख्यातून मुक्ती!
2 आरटीआय कार्यकर्त्यांना मोफत पोलीस संरक्षण
3 बोला, ‘हमो’ बोला..
Just Now!
X