तहानलेल्या जायकवाडीत भंडारदरा व मुळा धरणांतून पाणी सोडले असले, तरी नाशिक जिल्ह्य़ातून पाणी कधी सोडणार याचा निर्णय सोमवारीही होऊ शकला नाही. किती पाणी सोडावे, कोणत्या धरणातून ते किती वेगाने दिले जावे, याचे गणित अद्यापि ठरले नाही. नाशिक जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना या साठी सोमवारी मुंबईला मंत्रालयात बोलविण्यात आले, तथापि निर्णय होऊ शकला नाही.
दरम्यान, मुळा व भंडारदरातून सोडलेले एक टीएमसी पाणी संगमनेरजवळ आल्याची माहिती नगर जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यांनी दिली. जायकवाडीत पाणी कधी पोहोचेल, हे मात्र सांगितले जात नाही. पाणी पोहोचले तर त्याचे प्रमाण किती हेदेखील सांगता येणार नाही, असे जलसंपदा विभागातील अधिकारी सांगतात. जायकवाडी जलाशयातून औरंगाबादसह भोवतालच्या २०० खेडय़ांची तहान भागविता येईल, एवढे पाणी उपसा करता येणे शक्य आहे, असे मात्र अधिकारी आवर्जून सागत आहेत. दि. ३१ जुलैपर्यंत जायकवाडीतील पाणी कसे वापरले जाईल, याचे गणितही जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी तयार केले आहे.
औद्योगिक वसाहतीसह २.४३ टीएमसी पाणी पिण्यासाठी लागेल, तर ३.५३ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होणार    आहे.    गाळ    वजा जाता १६ टीएमसी    पाणी    जायकवाडीत असू    शकेल,    असे   सांगितले जाते.
मात्र, हे पाणी उपसा करता येणे शक्य नाही. विशिष्ट पातळीपर्यंत पंपग्रहाची सोय असल्याने पाणीपातळी खाली गेल्यास फ्लोटींग पंप व चर खणून शहराला सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल, असेही सांगितले जाते.
दि. ३१ जुलैपर्यंत पाणीवापराचे घातलेले गणित सोडविले असले तरी वरील धरणातून किती पाणी येणार?  हे मात्र कोणीच सांगत नाही. नगर जिल्ह्य़ातील धरणामधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असली, तरी नाशिक धरणातून पाणी का सोडले जात नाही? या प्रश्नाचे उत्तरही अधिकारी देत नाहीत. मंत्रालयात या अनुषंगाने चर्चा झाल्यानंतर निर्णय होईल, त्यानंतर पाणी सोडले जाईल.
पिण्याच्या पाण्याचे जलसंपदा विभागाचे गणित
——————————————————————
     शहर                                 प्रतिदिन गरज                    ३१ जुलैपर्यंतची एकूण आवश्यकता टीएमसी
——————————————————————
औरंगाबाद शहर                  १५० एमएलडी (दशलक्ष लिटर)               ०.५०  
ग्रामीण भाग           
(३४ योजना व २५० गावे)                        ५०एमएलडी                        ०.१७
औ’बाद औद्यागिक पाणीपुरवठा                ५० एमएलडी                       ०.१७
जालना, अंबड व गेवराई योजनांसाठी कालव्याने  ५दलघमी                 ०.५३
झरी, मानवत, परभणी व पाथरी                  १० दलघमी                        ०.३५
नदीकाठच्या गावांना आकस्मिक पाणीपुरवठा                                      ०.७०
एकूण लागणारे पाणी                                                                           २.४३
वापरता येईल असे पाणी                                                                      २.२७