उन्हाळ्याच्या सुटीत घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये झालेली लक्षणीय वाढ या सुटीचा कालावधी संपुष्टात येऊनही कमी होऊ शकलेली नाही. चोरी व घरफोडीच्या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या सहा घटनांमध्ये चोरटय़ांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनाक्रमामुळे शहरात जणू चोरटय़ांचे राज्य आहे की काय, अशी साशंकता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीतील नूर हेडर्स स्कॅप हे दुकान फोडून अडीच लाख रुपये किमतीचे कॉपर मुन्नाकुमार उमेशप्रसाद, जौहरत अलीखान व दाऊद या तीन संशयितांनी लंपास केल्याची तक्रार इस्समर सलीम शेख यांनी दिली आहे. या तक्रारीवरून तीन जणांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या सुटीत बाहेरगावी गेलेल्या कुटुंबीयांच्या घरांवर चोरटय़ांनी नजर ठेवली होती. कुलुपबंद घरे धुंडाळून ती फोडण्याचे अनेक प्रकार दीड महिन्यात घडले होते. या सुटय़ा संपुष्टात आल्यानंतरही हे प्रकार आटोक्यात येऊ शकले नसल्याचे दिसते. शिवाजी नगरच्या स्टेट बँक कॉलनीतील बंगल्यातील कार्यालयाचे टाळे तोडून चोरटय़ांनी ३० हजारांची रोकड, सीसी टीव्ही कॅमेरे व दोन संगणक असा एकूण ४७ हजार रुपयांचा माल लंपास केला. या प्रकरणी सचिन जयसिंघांनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडीची तिसरी घटना वनवैभव कॉलनीत घडली. शिवलीला रो हाऊसमधील दुसऱ्या क्रमांकाचे बंद घर चोरटय़ांचे लक्ष्य ठरले. २५ हजारांची रोकड आणि मौल्यवान सोन्याचे दागिने असा एकूण ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी गायब केला. या वेळी चोरटय़ांनी लगतच्या रो हाऊसमध्येही हात मारला. याबाबत किरण गुंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडाळा रस्त्यावरील मिरजकर नगर भागातील एक बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरटय़ांनी एलईडी टीव्ही, फोन व रोकड असा २६ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला. या संदर्भात निसार मणियार यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घरफोडय़ांप्रमाणे चोऱ्यांचेही प्रकार सुरू आहेत. द्वारका येथील खरबंदा पार्क संकुलात महिलेकडून १४ हजार ५०० रुपयांची रोकड दोन चोरटय़ांनी लंपास केली. मंदाबाई जाधव यांनी पतीच्या निवृत्ती वेतनाची रक्कम बँक ऑफ महाराष्ट्रमधून काढली होती. ही रक्कम मोजून बॅगेत ठेवत असताना दोघा संशयितांनी ती लंपास केली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर बसमधून द्वारका ते पौर्णिमा बसस्टॉप प्रवास करत असताना सौरभ कडवे याचा भ्रमणध्वनी चोरटय़ाने लंपास केला. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे शहरवासीयांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बनावट क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक
बनावट क्रेडिट कार्ड व पॅनकार्डच्या साहाय्याने सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने खरेदी करून त्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिटी सेंटरमधील रिलायन्स ज्वेल दालनात हा प्रकार घडला. प्रशांत शेट्टी ऊर्फ हरीश हेगडे आणि सैमभाई नायजेरियन या संशयितांनी संगनमताने रिलायन्स ज्वेल दालनातून बनावट क्रेडिट कार्ड व पॅनकार्डद्वारे ४७ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खरेदी केली. हा प्रकार नंतर उघड झाल्यावर संबंधितांनी सोन्याच्या चेनची विल्हेवाटही लावली होती. या प्रकरणी गौरव पाटोळे यांनी तक्रार दिली.