तूर व हरभऱ्याची खरेदी हमीभावानेच करावी, या मागणीसाठी लातूरची बाजारपेठ सलग पाचव्या दिवशी बंदच राहिली.
जिल्हा उपनिबंधक व बाजार समिती सचिवांनी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. शुक्रवारी एलबीटीविरोधात राज्यव्यापी ‘बंद’ होता. त्यामुळे बाजारपेठ बंदच राहिली. बाजार समिती पदाधिकारी, जिल्हा उपनिबंधक व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासमवेत बठकही निष्फळ ठरली. प्रत्येक जण आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे तिढा कायम आहे.
शेतीमालाची खरेदी हमीपेक्षा कमी भावाने होऊ नये अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. बाजारपेठेत येणाऱ्या मालाचा दर्जा ठरविणाऱ्या समितीने ‘नॉन एफएक्यू’चे पत्र दिले, तरच हमीपेक्षा कमी भावाने माल खरेदी करू. अन्यथा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून आमच्यावर फौजदारी खटले दाखल होणार असतील तर आपल्याला मालच खरेदी करायचा नसल्याची भूमिका आडते व खरेदीदारांनी घेतली.
सरकारच्या वतीने हमीभावाने खरेदीसाठी केंद्र सुरू झाले असले, तरी दर्जेदार मालच या केंद्रावर खरेदी होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी अशा केंद्रात न जाणेच पसंत केले. पणन महासंघातर्फे चाकूर, रेणापूर व उदगीर येथे खरेदी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. मात्र, या केंद्रांवर माल देण्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासच वाटत नसेल, तर उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्यांचा बाजारपेठेत येणारा माल सरसकट सारखा नसतो. येणाऱ्या मालाचा दर्जा तपासण्यासाठी समितीने निर्णय दिला, तरच बाजारपेठ सुरू होईल अन्यथा हा तिढा सोडवणे अवघड झाले आहे.
गतवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांनी आपला माल हमीभावापेक्षा कमी भावाने विकण्यास आमची तयारी आहे. कारण मालाचा दर्जा कमी प्रतीचा असल्याचे पत्र त्यांनी दिले आणि असे पत्र असतानाही जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून आडते व खरेदीदारांवर कोणतीही कारवाई होणार नाही, असे लेखी पत्र दिले तरच बाजारपेठ सुरू होण्याची चिन्हे आहेत.