जिल्हा विधि सेवा प्रधिकरण व जिल्हा वकील संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय इमारतीच्या न्यायाधीश परिषद सभागृहात नुकताच मध्यस्थी जागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश सुभाष मोहोड होते.
मध्यस्थीद्वारे पक्षकारांच्या मूळ समस्या जाणून घेतल्या जातात. त्यांचे संबंध आणखी बिघडू नये याची काळजी घेतली जाते व समझोत्याने प्रकरण निकाली काढण्यात येत असल्याचे अध्यक्षीय भाषणातून सुभाष मोहोड यांनी सांगितले. समाजात मध्यस्थीचे बीज उगवले गेले असून सध्या त्याची झपाटय़ाने वाढ होत आहे. लवकरच त्याचे रूपांतर एका वटवृक्षात होत आहे. नागपूर मध्यस्थी केंद्रातर्फे आजपर्यंत एकूण २,४४६ प्रकरणांचा निपटारा झाला असून त्याद्वारे हजारो पक्षकारांचा फायदा झाला असल्याचे प्रशिक्षित न्यायाधीश मध्यस्थ किशोर जयस्वाल यांनी स्वागतपर भाषणात सांगितले.
अ‍ॅड. पी. के. सत्यनाथन यांनी मध्यस्थीचा उद्देश, त्याची आवश्यकता व फायदे याविषयी मार्गदर्शन केले. अ‍ॅड. सचिन नराळे यांनी कुठले प्रकरण मध्यस्थी केंद्रात निकाली काढता येईल, याची माहिती दिली, तर अ‍ॅड. चरलवार यांनी न्यायाधीश, वकील, मध्यस्थ व पक्षकार यांच्या कर्तव्यावर प्रकाश टाकला.