विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून क्रीडा क्षेत्राशी संबंधित तीन जण निवडून आले असून त्यामुळे खेळाडूंसह क्रीडा संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे. या आमदारांमध्ये जामनेरचे गिरीश महाजन, चोपडय़ाचे प्रा. चंद्रकांत सोनवणे, अमळनेरचे शिरीष चौधरी यांचा समावेश आहे. हे तिघे आमदार विविध क्रीडा संघटनांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
जामनेर मतदारसंघातील भाजपचे आमदार गिरीश महाजन हे शुटींगबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल, महाराष्ट्र राज्य शुटींगबॉलचे अध्यक्ष तर राज्य बॉल बॅडमिंटन संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. सॉफ्टबॉल, बॅडमिंटन, शुटींगबॉल, क्रीडाभारती या जिल्हा क्रीडा संघटनांचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे असून ते शुटींगबॉलचे राष्ट्रीय, तर कबड्डीचे विद्यापीठस्तरीय खेळाडू आहेत.  चोपडय़ाचे प्रतिनिधीत्व करणारे शिवसेनेचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी राष्ट्रीय तसेच पुणे विद्यापीठस्तरावर खो-खो संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. बॉल बॅडमिंटन आणि कबड्डीच्या अनुक्रमे पुणे व मराठवाडा विद्यापीठाच्या संघातही ते होते.
 महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे उपाध्यक्षपदही त्यांच्याकडे असून जळगावातील तलवारबाजी, आटय़ा-पाटय़ा, शुटींगबॉल, सॉफ्टबॉल, व्हॉलीबॉल, किकबॉक्सिंग, सिकई मार्शल आर्ट, खो-खो, बॉल बॅडिमटन आदी क्रीडा संघटनांवर अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. अमळनेरचे अपक्ष आमदार शिरीष चौधरी हे महाराष्ट्र राज्य २० ट्वेन्टी क्रिकेट आणि राज्य रोपस्कीपिंग संघटनेच्या कार्याध्यक्षपदी आहेत. ते उत्कृष्ट कबड्डीपटू असून जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्षही आहेत. अमळनेर तालुका सॉफ्टबॉल, बॉल बॅडिमटन, आटय़ा-पाटय़ा आणि तलवारबाजी संघटनेचे अध्यक्षपदी त्यांच्याकडे आहे.