लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव साजरा करण्याचा ध्यास घेतलेल्या डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपक्रम केवळ उत्सवाच्या काळातच नव्हे तर वर्षभर राबविले जातात. गणेशोत्सव काळात कलात्मक देखावा, ज्ञानवर्धक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम यामुळे मंडळाने शहरामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदा गणेशोत्सव मंडळाने गौतम बुद्धांच्या शांतीचा संदेश देणाऱ्या विविध मुद्रा साकारल्या असून त्यातून मन:शांतीचा संदेश गणेशोत्सव मंडळाने दिला आहे. तसेच वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी दर्शनाला येणाऱ्या गणेशभक्तांना पुस्तके खरेदी करता यावीत, यासाठी एका विशेष पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन मंडळाने केले आहे. तर ‘श्रीं’ची मिरवणूक केवळ आपल्या परिसरातच काढून निर्माण होणाऱ्या अडचणींपासून शहरवासीयांची सुटका केली आहे. गणेशोत्सव म्हणजे मोठय़ा आवाजातील स्पीकर्स, मिरवणुकीतला अचकटविचक नाच, मांडवातील पत्त्यांचे डाव असा समज करून घेणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी डोंबिवलीतील टिळकनगर गणेशोत्सव मंडळाने एक आदर्श निर्माण केला आहे. डोंबिवलीतील समविचारी नागरिकांनी १९५० मध्ये एकत्र येऊन गणेशोत्व साजरा करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मांडवात साजरा होणारा हा उत्सव दिग्गज कलावंत, नामवंत वक्ते आणि मनोरंजनात्मक खेळांनी टिळकनगर परिसरामध्ये लोकप्रिय ठरू लागला. टिळकनगरच्या मोकळ्या मैदानामध्ये साजरा होणारा हा उत्सव १९९२ पासून सुयोग मंगल कार्यालयामध्ये होतो. यंदा मंडळ ६५ वे वर्ष साजरे करीत असून यानिमित्ताने जीवनातील धकाधकीत आवश्यक शांती देखाव्यातून साकारण्याचा निर्णय मंडळाने घेतला. कला दिग्दर्शक संजय धबडे यांनी गौतम बुद्धांच्या मुद्रातून ही शांती साकार केली. मंडळाचे व्यवस्थापन सोनाली पाठारे या महिला कार्यकर्तीकडे देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे. चित्रकला स्पर्धा, कॅरम स्पर्धा, विविध विषयांवरील व्याख्याने अशा विधायक उपक्रमांमधून उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मंडळ प्रयत्नशील असल्याची माहिती संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख संदीप वैद्य यांनी दिली.
विधायक मिरवणूक..
मंडळाने केवळ टिळकनगर परिसरामध्येच ‘श्रीं’ची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला असून पालखीतून गणपती विसर्जन तलावाकडे नेण्यात येतो. मंडळाच्या महिलांचे लेझीम आणि हालगी पथक या मिरवणुकीमध्ये आपली कला सादर करते. विवेक ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धी वैद्य हिच्या नेतृत्वाखाली हे पथक आपली कला सादर करते. टिळक पुतळ्याजवळ ही मिरवणूक आपली कला सादर करत असते. त्या वेळी हजारो डोंबिवलीकर येथील मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी गर्दी करतात. मात्र त्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास शहरातील अन्य नागरिकांना होणार नाही याची पुरेपूर काळजी मंडळ घेते. गुलाल बंदी असून फुलांच्या पायघडय़ा घालून या मिरवणुकीचे स्वागत रस्त्यात केले जाते.  
दर्शनाला या पुस्तके खरेदी करा!
गणेशोत्सवानिमित्ताने फ्रेंड लायब्ररीच्या सहकार्याने मंडळ गेली तीन वर्षे पुस्तक प्रदर्शन आयोजित करते. त्यामुळे दर्शनाला येणाऱ्या भाविकांना पुस्तक खरेदी करण्याची संधी मिळते.