गुन्हेगार कितीही चाणाक्ष असला तरी तो एखादी चूक करीत असतो. या चुकाही केवळ क्षुल्लक नसतात, तर गमतीशीरही असतात. कधी कधी पोलिसांच्या चाणाक्ष नजरेत त्या पडतात आणि मग गुन्हेगार पकडला जातो. बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र (पासपोर्ट) बनविणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटना अशाच हुशार पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे उघडकीस आल्या. बुधवारी टिळकनगर पोलिसांनी बनावट पारपत्र बनविणाऱ्या टोळीला अटक केली. त्याचा सुगावा फक्त एका पिन कोडमुळे लागला. तर अन्य घटनेत बंगाली माणसाला मराठी विषयात जास्त मार्क कसे, या शंकने बनावट कागदपत्रांचा शोध लागला.
पारपत्र बनविण्यासाठी कागदपत्रांची पोलीस ठाण्यातून पडताळणी केली जाते. प्रत्येक पोलीस ठाण्यात त्याचा एक स्वतंत्र विभाग असतो. टिळकनगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार नामदेव बांडे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे मिनाज सलीम शेख (२४) नावाची महिला पारपत्र पडताळणीसाठी आली होती. ती चेंबूरच्या पंचशील नगरात राहत होती. पारपत्र पडताळणीसाठी ती पोलीस ठाण्यात आली. तिने आपली कागदपत्रे सादर केली. बांडे यांनी कागदपत्रांवर नजर टाकली. सर्व कागदपत्रे बरोबर होती. पण तिच्या रिलायन्सच्या वीज बिलावरील पिन कोडने त्यांचे लक्ष वेधून घेतले. पंचशीलनगरचा पिन कोड ४०००८९ असा आहे. पण तिच्या बिलावर ४०००७४ असा पिन कोड होता. तिला विचारले तेव्हा ती म्हणाली, मला हे बिल रिलायन्सने माझ्या पत्त्यावर पाठवले आहे. त्यांच्याकडून चूक झाली असेल, अशी सारवासारव केली. पण जर पोस्टाने बिल आले असेल तर चुकीच्या पिन कोडवर जाणार नाही, हे बांडे यांनी हेरले. त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत सोनावणे यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी ताबडतोब एक कर्मचारी रिलायन्सच्या वीज कार्यालयात चौकशीसाठी पाठवला. तेव्हा हे बिल बनावट असल्याचे लक्षात आले. एका पिन कोडमधील फरकामुळे हा प्रकार पोलीस हवालदार बांडे यांनी उघडकीस आणला. सोनावणे यांनी या प्रकरणी तपास सुरू केला आणि पारपत्र बनवून देण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत सोनावणे, पोलीस निरीक्षक डिगोळे (गुन्हे), साहाय्यक पोलीस निरीक्षक पोरे, पोलीस उपनिरीक्षक अडसूळ आदींच्या पथकाने या टोळीची पाळेमुळे खणून काढली. या टोळीने यापूर्वी बनवलेले पारपत्र जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मराठीची अतिहुशारी नडली
मागील वर्षी चारकोप पोलिसांच्या अशाच चाणाक्षपणामुळे पारपत्र बनविण्यासाठी बनावट कागदपत्रे घेऊन आलेल्या इसमाचे बिंग फुटले आणि एक टोळी उघडकीस आली. सुमित्रा चक्रवर्ती (३२) हा काही वर्षांपूर्वी मुंबईत आला होता. त्याने मालाड परिसरात एक चायनीजचे हॉटेल टाकले. पाच वर्षे तो या व्यवसायात स्थिर झाला. आता मुंबईतच आपले बस्तान बसवायचे असा त्याने निर्णय घेतला. त्याला पारपत्रही हवे होते. त्याने मढ परिसरात राहणाऱ्या भूपेश सुरती या एजंटशी संपर्क साधला. सुरतीने त्याला प्रत्येक कागदपत्रांसाठी सात हजार रुपये घेतले आणि त्याला दहावीची गुणपत्रिका, दाखला, रहिवासी दाखला आदी सर्व दाखले बनवून दिले. चक्रवर्तीने पारपत्रासाठी अर्ज केला आणि कागदपत्र पडताळणीसाठी चारकोप पोलीस ठाण्यात गेला. तेथील पोलिसांना काहीच संशय आला नाही. सर्व कागदपत्रे व्यवस्थित होती. परंतु अचानक त्याच्या दहावीच्या गुणपत्रिकेवर नजर टाकली असता त्याला मराठीत ७९ गुण मिळाल्याचे दिसले. त्यामुळे पोलिसाला आश्चर्य वाटले. बंगाली भाषिक माणसाला मराठी विषयात ७९ गुण मिळाले आणि ही व्यक्ती हिंदीत का बोलते, याचे कुतूहल वाटले. चौकशी केल्यावर मैं मराठी भूल गया, असे उत्तर त्याने दिले. मग पोलिसांचा संशय बळावला. त्याची मग कसून चौकशी केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी चक्रवर्ती आणि सुरती या दोघांना अटक केली. या एजंटने शेकडो बोगस प्रमाणपत्रे बनविल्याचे तपासात उघड झाले होते.
सुहास बिऱ्हाडे, मुंबई</strong>