निकृष्ट दर्जा, निविदा प्रक्रियेतील घोळ आणि कंत्राटदाराला मिळालेला राजाश्रय यामुळे यापूर्वीच बदनाम ठरलेल्या घोडबंदर भागातील ग्लॅडिस अल्वारिस मार्गावर ठाणे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने आणखी एका वादग्रस्त प्रकल्पाची आखणी केली असून या भागातील फेरीवाल्यांपासून मुक्ती मिळावी याकरिता तब्बल सात कोटी रुपये खर्च करून थेट भुयारी मार्ग विकसित करण्याचा अजब निर्णय अभियांत्रिकी विभागाने घेतला आहे. ग्लॅडिस अल्वारिस मार्गावरील वसंत विहार चौकातील कानाकोपरा सध्या बेकायदा फेरीवाले आणि टपऱ्यांनी वेढला गेला आहे. यामुळे या भागात मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. असे असताना वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या फेरीवाल्यांच्या मुसक्या आवळण्याऐवजी अभियांत्रिकी विभागाने त्यांना पर्यायी जागा देण्याचा विचार सुरू केला असून यासाठी या भागात भुयारी मार्ग उभारून त्यामध्ये ३० व्यावसायिक गाळे उभारण्याचा प्रकल्प आखण्यात आला आहे.
महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या आग्रहामुळे अभियांत्रिकी विभागाने हा प्रकल्प पुढे दामटला असला तरी विकास नियंत्रण नियमावलीतील सुरक्षा योजनेसंबंधीच्या तरतुदींचा आधार या प्रकल्पास आहे का, असा सवाल आतापासूनच उपस्थित केला जात आहे. ठाणे महापालिका हद्दीत ग्लॅडी अल्वारिस हा महत्त्वाचा रस्ता असून त्याद्वारे पोखरण रोड आणि घोडबंदर रस्ता जोडला जातो. ठाण्याच्या पश्चिमेकडे मोठय़ा प्रमाणावर झालेल्या नागरीकरणाचा हा रस्ता म्हणजे महत्त्वाचे अंग असून वसंत विहार, कोठारी कंपाऊंड अशी मोठी गृहसंकुलांसाठी हा हमरस्ता मानला जातो. याशिवाय कापूरबावडी ते मानपाडा या घोडबंदर रस्त्याच्या भागास ग्लॅडी अल्वारिस हा एकमेव पर्यायी मार्ग आहे.

*  फेरीवाल्यांचा वेढा
इतका महत्त्वाचा रस्ता खरे तर फेरीवालामुक्त ठेवण्यासाठी महापालिकेने यापूर्वीच कंबर कसायला हवी होती. असे असताना या ठिकाणी जागोजागी भाजी, फळे विक्रेत्यांनी पदपथ, रस्ता अडविल्याने या जंक्शनवर वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या लेखी हे सर्व विक्रेते दैनंदिन गरजेच्या वस्तू विकत असल्याने त्यांच्यावर कारवाई करताना आतापर्यंत हात आखडता घेण्यात आला आहे.
*  महापौरांच्या आग्रहापुढे काही चालेना..
या भागातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाईची गरज असताना महापौर हरिश्ंचद्र पाटील यांनी या ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्याचा आग्रह धरला आहे. महापालिकेचे शहर अभियंता के.डी.लाला यांनाही महापौरांचा आग्रह मोडवेनासा झाला असून त्यांनी थेट सात कोटी रुपयांच्या भुयारी मार्गाच्या प्रकल्पाची आखणी करून सर्वानाच तोंडात बोटे घालायला लावली आहेत. वसंत विहार जंक्शन येथे भुयारी पादचारी मार्गाची आखणी करून तेथे ५० फुटांचे ३० व्यावसायिक गाळे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून तेथे जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने थाटण्यात येणार आहेत. ठाण्यात यापूर्वी बांधण्यात आलेल्या पादचारी मार्गाचा फारसा वापर होत नसल्याच्या तक्रारी असताना ग्लॅडिस अल्वारिस मार्गावरील या नियोजित पादचारी मार्गाचा कितपत वापर होईल, असा सवाल आतापासूनच उपस्थित केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या भुयारी मार्गाच्या उभारणीनंतर तरी हा सगळा परिसर फेरीवाला मुक्त होईल का, असा सवाल उपस्थित होत असून ठाण्याच्या विकास नियंत्रण नियमावलीत अशा व्यावसायिक भुयारी मार्गाची तरतूद आहे का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. यासंबंधी नगर अभियंता के.डी.लाला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ‘साहेब बैठकीत व्यस्त आहेत’, असे उत्तर देण्यात आले. महापौर पाटील यांनी मोबाइल उचलला नाही.