ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर या मार्गावर अवैध बस वाहतूक बंद होताच मोठय़ा प्रमाणावर निर्माण झालेल्या व्यावसायिक संधीचा लाभ घेण्यासाठी वसई-विरार महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने आघाडी घेतली असून वसई-घोडबंदर-ठाणे-मुलुंड या मार्गावर वाढीव बससेवा सुरू करून ठाणे महापालिका परिवहन उपक्रमास एकप्रकारे चपराक लगावली आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमधील प्रवाशांची गरज लक्षात घेतली तर ‘टीएमटी’ला व्यवसाय वाढीची उत्तम संधी आहे. मात्र, वारंवार नादुरुस्त पडणाऱ्या बसेस, ढिसाळ नियोजन आणि सुलभ सेवा देण्यात अपयशी ठरलेल्या ‘टीएमटी’ उपक्रमास या संधीचे सोने करता आलेले नाही. ठाण्यासारख्या उत्तम ‘मार्केट’कडे इतके दिवस डोळे लावून असणाऱ्या वसई-विरार परिवहन उपक्रमाने घोडबंदर मार्गावरील अवैध बसेसवर कारवाई सुरू होताच चालून आलेल्या संधीचा फायदा उठवायला सुरुवात केली आहे.
ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर अशा मार्गावर गेली अनेक वर्षे पन्नासहून अधिक अवैध बसेस धावतात. उत्तम वारंवारता आणि तुलनेने स्वस्त प्रवासी सुविधा यामुळे घोडबंदरवासीयांचा कल या अवैध वाहतुकीकडे मोठय़ा प्रमाणावर असायचा. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील परिसरात या अवैध वाहतुकीमुळे मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. मात्र, काही मोजके अपवाद वगळता ठाण्यातील एकाही राजकीय नेत्याने वर्षांनुवर्षे सुरू असलेल्या या अवैध वाहतुकीविषयी साधा ‘ब्र’देखील उच्चारला नव्हता. ठाणे परिवहन विभागाचे अधिकारी मध्येच कधीतरी या बसेसवर कारवाई करत असत. मात्र, अवैध बस वाहतूकदार आणि परिवहन विभागातील अधिकाऱ्यांचे साटेलोटे नेहमीच चर्चेचा विषय ठरला. ठाणे पूर्वेकडे या बसेसमुळे मोठी कोंडी होत असतानाही डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला वाहतूक पोलीस विभागही हे सगळे उघडय़ा डोळ्याने पाहात असायचा. हे सगळे एकीकडे व्यवस्थित सुरू असताना विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी गेल्या आठवडय़ात एक बैठक घेत ही अवैध सेवा बंद करण्याचे फर्मान काढले. घोडबंदर मार्गावरील राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांचा या अवैध वाहतुकीस छुपा पाठिंबा असल्याची चर्चा असून याच मार्गावरील शिवसेनेच्या एक बडा नेत्याच्या काही बसेसही येथे धावतात. असे असताना एरवी ‘सर्वसमावेशक’ राजकारणासाठी ओळखले जाणारे डावखरे यांनी ही वाहतूक बंद करण्याचे फर्मान काढल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.
 सोमवारपासून अवैध बस वाहतूक बंद होताच घोडबंदर मार्गावरील प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ लागली असून रिक्षाचालकांच्या मुजोरपणाकडे ‘आरटीओ’चे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी प्रवासी करू लागले आहेत. अवैध असली तरी सोयीची अशी बससेवा बंद झाली, टीएमटीचा नाकर्तेपणा सुरूच आहे आणि रिक्षाचालकांचा मनमानी कारभार या तिहेरी कोंडीत प्रवासी सापडले असतानाच वसई-विरार महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने प्रवाशांची चिंता काही प्रमाणात कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत.  नालासोपारा-घोडबंदर-मुलुंड आणि वसई-घोडबंदर-मुलुंड या मार्गावर सकाळच्या वेळेत बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या असून प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता या मार्गावरील सेवेचे उत्पन्न नेहमीपेक्षा वाढले आहे, असा दावा सूत्रांनी केला. येत्या दोन दिवसांत आणखी बसेस वाढविण्यात येतील, अशी माहितीही देण्यात आली.