उरण शहर व परिसराचा विस्तार वाढत असून सिडकोच्या माध्यमातून नव्याने निर्माण होणाऱ्या वसाहतींमुळे शहराचा अधिक विस्तार होणार आहे. मात्र, उरण शहरातील रस्ते अरुंद असल्याने शहरातील प्रवेशद्वार असलेल्या कोटनाका व उरण एस.टी.स्टँड चारफाटा येथील वाहतूक कोंडी ही नित्याची बनली आहे. या वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी उरण नगरपालिका व वाहतूक विभागाच्या गेल्या अनेक वर्षांत बठका होऊन निर्णयही घेण्यात आलेले आहेत. मात्र, या उपाययोजना कागदावरच राहिल्याने उरणकरांना मात्र नित्याच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
अवघ्या अडीच ते तीन किलोमीटरच्या परिसरात उरण शहर येते. शहरातील रस्त्यांवर दुकानदारांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ते अधिकच अरुंद झाले आहेत. त्याच प्रमाणे रस्त्याच्या कडेला लागणाऱ्या हातगाडय़ांमुळेही वाहतूक कोंडीत भर पडली आहे. वाढत्या शहरामुळे खरेदीसाठी येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था कमी प्रमाणात आहे. असे असले तरी या ठिकाणी वाहने उभी करण्यात येत नाही. अनेक वाहन चालक रस्त्यातच वाहने उभी करून दुकानात खरेदी करण्यासाठी जातात. असे चित्र नेहमीच उरण शहरात पाहावयास मिळते. तर शहरातील अरुंद रस्त्यावर अनेक बडय़ा लोकांच्या आलिशान गाडय़ा उभ्या असतात. या वाहनांवर कारवाई करण्याकडे वाहतूक पोलीस सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना दिसून येतात. वाहतूक कोंडी झाली तर नाक्यावरचे पोलीस बघ्याची भूमिका घेताना दिसून येतात. या विषयी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर सिडकोच्या माध्यमातून उरण शहरातील रस्त्याला बायपास मार्गाची मंजुरी मिळाली असली तरी मागील तीन वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे.