महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जाधववाडी परिसरातील अतिक्रमणे काढली. पूर्वकल्पना न देता अतिक्रमणांवर हातोडा घातल्याने नागरिक व पथकातील अधिकारी यांच्यात वादावादी झाली. नागरिकांच्या तक्रारींकडे लक्ष न देता रस्ताकामाला अडथळे ठरणारी अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. या मोहिमेत जेसीबी, डंपर या वाहनांसह ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
मार्केट यार्ड परिसरातील जाधववाडी भागात ३५ फूट रस्ता रुंदीकरण केले जाणार आहे. या कामासाठी राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेतून निधी मंजूर झाला आहे. तथापि रस्ता कामामध्ये अतिक्रमणांचा अडथळा होता. अतिक्रमण केल्या जाणाऱ्या जमिनीवर नगररचना विभागाच्या वतीने माìकग करण्यात आले होते. मात्र नागरिकांनी अतिक्रमण काढलेले नव्हते.
मंगळवारी महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक ४ चे अधिकारी, कर्मचारी वाहनांसह जाधववाडी परिसरात आले. त्यांनी थेट अतिक्रमणांवर हातोडा घालण्यास सुरुवात केली. पूर्वसूचना न देता अतिक्रमणे काढली जात असल्याने तेथील नागरिकांनी जोरदार आक्षेप घेतला. नागरिकांनी अतिक्रमण निर्मूलन पथकातील अधिकाऱ्यांनी हुज्जत घातली. अतिक्रमणे काढण्याची महापालिकेची भूमिका कायम राहिली. त्यानुसार रस्ता मार्गात अडथळा ठरणाऱ्या झोपडय़ा, पत्र्याचे शेड, घराच्या संरक्षक िभती, जनावरांचे गोठे, दोन बाथरुम अशी विविध प्रकारची अतिक्रमणे काढून टाकण्यात आली.
या मोहिमेत उपशहर अभियंता एम. एम. निर्मळे, आर. के. जाधव, कनिष्ठ अभियंता पद्मल पाटील, अतिक्रमण विभागाचे तसेच विभागीय कार्यालयाचे सुमारे ३० कर्मचारी, मुकादम सहभागी झाले होते.