केंद्रीय ग्रामविकासमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. श्रद्धांजली सभांद्वारे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
मनमाडमध्ये दुखवटा म्हणून बंद पाळण्यात आला. एकात्मता चौकातील कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी अनेकांना शोक अनावर झाला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी मुंडे यांच्या कार्याचा आढावा घेतला. या वेळी माजी आमदार राजाभाऊ देशमुख, शिवसेना शहरप्रमुख संतोष बळीद, भाजप शहरप्रमुख नारायण पवार, उमाकांत राय, शिवसेना जिल्हा उपप्रमुख नाना शिंदे, सुनील पाटील आदी उपस्थित होते. राजाभाऊ देशमुख यांनी विधानसभेत मुंडे यांच्याबरोबर पाच वर्षे काम करण्याची संधी युती सरकारच्या काळात मिळाली, हे आपण आपले भाग्य समजतो, असे सांगितले. मुंडे यांना ग्रामीण भागातील प्रश्नांची चांगलीच जाणीव होती. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. युती सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री तत्पूर्वी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचे काम कायम स्मरणात राहील असे झाल्याचेही त्यांनी नमूद केले. शिवसेना शहरप्रमुख संतोष बळीद यांनी मुंडे यांच्या निधनाने महायुतीला मोठा धक्का बसल्याचे सांगितले. भाजप शहराध्यक्ष नारायण पवार यांनी मुंडे यांचे भाजपमधील स्थान अबाधित होते, असे नमूद केले. उत्तम संघटन कौशल्य, प्रश्नांची जाण आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना समजून घेणाऱ्या मुंडे यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतलेल्या मुंडे यांनी या खात्याच्या माध्यमांतून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलविला असता, अशी भावना शिवसेना उपप्रमुख नाना शिंदे यांनी व्यक्त केली.
बहुजन स्वराज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद नाथेकर यांनी मुंडे यांच्या निधनामुळे इतर मागासवर्गीय बहुजनांची मोठी हानी झाल्याचे मत मांडले. मुंडे नेहमी बहुजनांच्या हितासाठी आक्रमक होत, असेही त्यांनी सांगितले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कर्मचारी संघटना व ग्रामरोजगार सेवक संघटना यांच्या वतीने नाशिक येथील आयटक कामगार केंद्रात राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंडे हे मनरेगा कर्मचारी व ग्रामरोजगार सेवकांनी राज्यभर पुकारलेल्या आंदोलनाबाबत बीड येथे पदधिकाऱ्यांशी चर्चा करणार होते. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाल्याची भावना या वेळी मान्यवरांनी व्यक्त केली. याप्रसंगी सचिन पाटील, विनय कटारे, ओंकार जाधव, सनी धात्रक आदी उपस्थित होते.
नाशिक जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बुरड यांनी श्रद्धांजली अर्पण करताना उपमुख्यमंत्री म्हणून मुंडे यांनी केलेल्या कार्यास उजाळा दिला. जकात, स्थानिक संस्था कर, टोल हे कर मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे रद्द होण्याची जनतेला अपेक्षा होती, असेही त्यांनी सांगितले.