राज्यातील मंदिरांमध्ये मोठय़ा प्रमाणात पैसा अडकला आहे. मंदिराच्या विश्वस्तांनी दुष्काळासाठी तो निधी द्यावा, अशी मागणी योग्य आहे. मंदिर विश्वस्तांनी यावर विचार करावा, असे मत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांनी बुधवारी व्यक्त केले.
पाणी, चारा व रोजगाराची स्थिती गंभीर आहे. मात्र, मराठवाडय़ातील दुष्काळाबाबत राज्यातील सरकार राजकारण व भेदभाव करीत असल्याचा आरोप खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केला. वैद्यनाथ बँकेच्या ३६व्या शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दुष्काळाच्या अनुषंगाने १६ फेब्रुवारीपासून मुंडे दुष्काळी परिक्रमा करणार आहेत. येत्या काही दिवसांत मराठवाडय़ात ‘पाणी बळी’ पडतील. रेल्वेने पाणी सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. पण अजून काहीही सकारात्मक घडले नाही. ‘आई जेऊ देईना आणि बाप भीक मागू देईना’ अशी मराठवाडय़ाची स्थिती आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मदत करणे सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे. पण त्याकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. पश्चिम महाराष्ट्रात चारा छावण्यांसाठी ४६० कोटी खर्च झाले. मराठवाडय़ात मात्र १० कोटीच खर्च झाले. साखळी बंधाऱ्यांवर पश्चिम महाराष्ट्रात ६१० कोटी निधी मंजूर झाला. मराठवाडय़ासाठी सरकारने एक पैसाही मंजूर केला नाही, याकडे मुंडे यांनी या वेळी लक्ष वेधले. मराठवाडय़ातील दुष्काळाकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष आहे. दुष्काळी प्रश्नावर अधिवेशन घेण्याच्या शिवस्सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागणीला सहमती दर्शवत दुष्काळ परिक्रमा करणार असल्याचे मुंडे यांनी जाहीर केले. दि. २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाध्यक्षांच्या निवडी पूर्ण होतील. त्यानंतर प्रदेशध्यक्ष निवडीचा कार्यक्रम घ्यावा, अशी विनंती केल्याचे मुंडे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे तिघे भाजपमध्ये
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यकारिणीचे सदस्य अविनाश लोमटे, विजय गंभिरे व राजा ठाकूर या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला.