ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे श्रद्घास्थान असलेल्या राळेगणसिद्घीतील संत यादवबाबा मंदिरातील दानपेटी फोडण्याचा तसेच मंदिराबाहेरील द्वारपालाच्या मूर्तीची मोडतोड करून विटंबना करण्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला. पारनेर पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, दोघेही राळेगणसिद्घीतील असल्याचे सांगण्यात आले. मात्र या प्रकरणी उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडल्यानंतर सकाळी ग्रामस्थांच्या तो लक्षात आला. विटंबना करण्यात आलेली मूर्ती तेथून तातडीने काढून घेण्यात आली. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांना हा प्रकार समजताच त्यांनी राळेगणसिद्घीला धाव घेतली. समाजकंटकांनी मूर्तीच्या हातातील भाला तोडला व तो मंदिर परिसरात टाकून देण्यात आल्याचे सकाळी निदर्शनास आले. पोलीस उपाधीक्षक डॉ. अनिता जमादार यांनीही सकाळी मंदिरास भेट देऊन पाहणी केली.
मंदिरातील दानपेटी उचकटून काडीच्या साहाय्याने काही चिल्लर काढण्याचा प्रयत्न झाला. ही दानपेटी दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहापूर्वी उघडण्यात येते. यंदाचा अखंड हरिनाम सप्ताह पुढील महिन्यात असून त्यासाठी पेटी उघडण्यापूर्वीच डल्ला मारण्याचा प्रयत्न होता. दानपेटीची चावी हजारे यांच्याकडेच असून अखंड हरिनाम सप्ताहापूर्वी ती उघडली जाणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी या दानपेटीत सुमारे तीस हजार रुपये जमा झाले होते. यंदा जास्त रक्कम निघेल असा गावक-यांचा अंदाज आहे. अलीकडेच झालेल्या जनलोकपाल आंदोलनादरम्यान अनेकांनी या मंदिरास भेट दिली आहे.