कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणारा येथील कांचन मेश्राम हिच्या बलात्कार व खून प्रकरणातील दोन आरोपींना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. राकेश मनोहर कांबळे (रा. बाभुळखेडा) आणि अमरसिंग किसनसिंग ठाकूर (रा. अजनी) अशी या दोघांची नावे असून ते दोघेही खतरनाक गुन्हेगार आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांनी दोघांना खुनाच्या गुन्ह्य़ासाठी मृत्यूदंड, अपहरण व चोरीच्या गुन्ह्य़ासाठी (भादंवि कलम ३६७) जन्मठेप तसेच बलात्कार आणि खुनाच्या उद्देशाने अपहरण केल्याच्या गुन्ह्य़ासाठी प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड अशी जबर शिक्षा ठोठावली. हे दोघेही कुख्यात गुन्हेगार अनेक गुन्ह्य़ांमध्ये सहभागी होते आणि गुन्ह्य़ानंतर कित्येक वर्षे पोलिसांच्या हाती तुरी देऊन फरार होते. त्यामुळे दोघांना ओळखणाऱ्यांनी त्यांना देण्यात आलेल्या शिक्षेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
मृत कांचन श्यामराव मेश्राम ही लोणारा गावात राहात होती. १८ डिसेंबर २००५ रोजी ती घरात झोपली असताना पहाटे तीन- साडेतीन्च्या सुमारास हे दोन्ही नराधम घराचे बंद दार तोडून आत घुसले. त्यांनी तिला चाकू व देशी कट्टय़ाचा धाक दाखवला. त्यांना पाहून घाबरलेली कांचन शेजारी राहणारे काका भीमराव मेश्राम यांच्या घरी पळाली.
दोन्ही आरोपींना तिचा पाठलाग करत भीमरावच्या घराचे दार तोडून तिला ओढत अंगणात फेकले. यानंतर या दोघांनी तिला उचलून गावातील एका शेतात नेले व तेथे असहाय्य कांचनवर त्यांनी बलात्कार केला. एवढय़ावरच त्यांच्या अंगातील सैतान शांत झाला नाही. त्यांनी धारदार शस्त्राने तिच्या डोक्यावर, छातीवर आणि गालावर अनेक वार करून तिचा निर्घृण खून केला. यानंतर दोघेही फरार झाले.
कळमेश्वर पोलिसांनी राकेश कांबळे याला ६ जून २००६ रोजी, तर अमरसिंग ठाकूर याला २९ मे २०१० रोजी अटक केली. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण भादीकर यांनी या गुन्ह्य़ाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात अभियोजन पक्षातर्फे एकूण १९ साक्षीदार तपासण्यात आले.
अमरसिंग ठाकूर व राकेश कांबळे हे दोघेही खतरनाक गुन्हेगार होते आणि त्यांचा अनेक गुन्ह्य़ांमध्ये सहभाग होता. अमरसिंग ठाकूर याच्यावर पूर्वी पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली (मोक्का) कारवाई केली होती. त्यात सजा भोगत असताना २५ मे २००५ रोजी तो मेडिकल हॉस्पिटलमधील खिडकी तोडून पळाला. तेव्हापासून तो फरार होता. याच काळात तो जाऊन राकेशला भेटला. १६ जून २००५ रोजी हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी एका महिलेचे दागिने चोरून तिचा खून केला. त्यानंतर ते सतत पोलिसांना हुलकावणी देत होते.
राकेश व अमरसिंग हे दोघे ओळखीतून लोणारा येथे कांचनचा भाऊ पवन याच्याकडे जात होते. तेथे त्यांची कांचनवर वाईट नजर पडली. यातूनच हे कुकृत्य करून ते फरार झाले. गुन्ह्य़ानंतर सुमारे वर्षभराने राकेशला अटक करण्यात आली. ठाकूर मात्र बराच काळ फरार होता. या काळात तो अजनी येथे एका घरात लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक माहुरकर त्याला पकडण्यासाठी गेले असताना ठाकूरने त्यांच्यावर गोळी झाडली होती. या प्रकरणी त्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर २०१० साली ग्वाल्हेर पोलिसांनी ठाकूर याला रेल्वेवरील एका दरोडय़ात अटक केली. त्यानंतर, म्हणजे बलात्कार व खून प्रकरणानंतर पाच वर्षांनी ठाकूर पोलिसांच्या ताब्यात आला. यानंतर दोन्ही आरोपींवर मोक्का, खून व दरोडा आणि खून व बलात्कार या आरोपांखाली खटला चालला. ठाकूर याच्यावर प्राणघातक हल्ल्याचाही आरोप होता. दोघेही धोकादायक असल्याची बाब लक्षात घेऊन खटल्याच्या सुनावणीदरम्यान सदर पोलिसांचा ताफा या दोघांमागे राहात असे. तरीही हे दोघे न्यायालय परिसरात गोंधळ घालत असत.
आरोपींनी केलेले कृत्य अतिशय घृणित आहे. दोन्ही आरोपींना गुन्हेगारीची मोठी पाश्र्वभूमी आहे. त्यांच्यात सुधारणा होण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. या दोघांपासून समाजाला धोका असून त्यांना समाजात जगण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांना मृत्यूदंडाची शिक्षाच योग्य आहे, असे मत अतिरिक्त सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांनी निकालपत्रात नोंदवले.
सरकारची बाजू अतिरिक्त सरकारी वकील कल्पना पांडे यांनी मांडली, तर आरोपींतर्फे अ‍ॅड. पराग उके व अ‍ॅड. धूत यांनी काम पाहिले. सुरुवातीला अमरसिंग ठाकूर याने खटल्यात दोघांची बाजू स्वत:च मांडली होती.