पिरवाडी किनाऱ्यावरील सागरी सुरक्षा दलाच्या जवानांना साधनांची कमतरता
असुविधांनी ग्रस्त असलेल्या उरणच्या सागरी सुरक्षा दलाच्या जवानांनी जिवावर उदार होऊन पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर अचानक आलेल्या समुद्राच्या भरतीमुळे अडकलेल्या पनवेल परिसरातील दोन पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले. सागरी सुरक्षा दलाच्या जवानांनी सतर्कता दाखविल्यानेच या दोघांचे प्राण वाचू शकले.
उरण तालुक्यातील अरबी समुद्र किनाऱ्यावर पिरवाडी बीच आहे. या किनाऱ्यावर मोठय़ा संख्येने मुंबई, नवी मुंबई विभागातून पर्यटक येतात. यापैकी अनेक पर्यटक ओहोटीच्या वेळी समुद्रातील खडकावर बसण्यासाठी जातात. अशाच प्रकारे रोहन बेन व संजय जाधव हे पनवेलमधील दोन पर्यटक खडकावर बसले होते.
समुद्राच्या भरतीची त्यांना कल्पना नसल्याने अचानक त्यांच्या सभोवताली पाणी साचल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी सागरी सुरक्षा दलाचे प्रमुख स्वप्नील माळी यांनी सिडकोच्या अग्निशमन दलाशी तसेच पोलिसांशी संपर्क साधला तर त्यांचे सहकारी आशीष काठे व प्रमोद घरत यांनी होडीच्या साहाय्याने समुद्रात जाऊन या दोन्ही पर्यटकांना सुखरूप किनाऱ्यावर आणले. पिरवाडी किनाऱ्यावर सागरी सुरक्षा दलाचे जवान म्हणून काम करणाऱ्या जवानांना सुरक्षा देणारे साहित्य उपलब्ध नसतानाही आपला जीव धोक्यात टाकून हे जवान मदतकार्याचे काम करीत आहेत.