ठाणे महापालिकेत बार मालकांची असाधारण सभा भरवून वाद ओढवून घेणारे सत्ताधारी शिवसेनेचे नेते अडचणीत सापडले असून स्थानिक नेत्यांच्या उपद्व्यापामुळे पक्षाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होत असल्याने पक्षप्रमुख ऊद्धव ठाकरे यांनी सोमवारी महापौर संजय मोरे यांचे कान उपटल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा सुरू असताना सभा तहकूब करून महापौर आणि आयुक्तांना या बार मालकांची भेट घेण्यास पक्षाच्या एका ‘प्रतापी’ आमदाराने भरीस पाडले. यामुळे महापौरपदाची कारकीर्द सुरू होऊन जेमतेम दोन महिने होत नाहीत तोच संजय मोरे वादात सापडले आहेत. पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे मोरे यांना अडचणीत आणण्यासाठी स्वकीयांनीच ही खेळी खेळली असावी का, अशी चर्चा महापालिकेत दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
ठाणे महापालिकेचा आर्थिक डोलारा गेल्या काही महिन्यांपासून कोसळत असल्याचे चित्र उभे राहू लागले आहे. आठ महिन्यांपूर्वी आयुक्त असीम गुप्ता यांनी सुमारे २१०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडत वेगवेगळ्या योजनांचा सारीपाट ठाणेकरांपुढे मांडला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे या अर्थसंकल्पाला हिरवा कंदील दाखविताना नोव्हेंबर महिना उजाडला. आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात तब्बल ६०० कोटी रुपयांची भर टाकत महापौरांनी प्रशासनाकडे अंतिम मसुदा सादर केला. मात्र, स्थानिक संस्था कराची वसुली प्रभावीपणे होत नसल्याचे कारण पुढे करत जमा-खर्चाचे गणित बसविणे कठीण असल्याचे मत व्यक्त करत आयुक्तांनी सर्वसाधारण सभेने सादर केलेल्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करणे कठीण असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे महापालिकेत आर्थिक पेच उभा ठाकला असल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही महत्त्वाची सभा सुरू असताना महापौरांच्या विशेष कक्षात बार मालकांची असाधारण सभा भरल्याच्या आरोपांमुळे शिवसेना नेते अडचणीत सापडले आहेत.
आयुक्तही तोंडघशी
ठाणे शहरातील हॉटेल मालकांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने एखादी बैठक घेण्यात काहीच गैर नव्हते. मात्र, सर्वसाधारण सभा सुरू असतानाच ‘प्रतापी’ नेत्यांची फौज बार मालकांना घेऊन महापालिकेत थडकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महापालिकेच्या कामकाजात सर्वसाधारण सभेला महत्त्व असते. शहराच्या नियोजनाची धोरणे या सभेत ठरत असतात. असे असताना ‘मनमौजी’ कारभारासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेच्या दोघा नेत्यांनी बार मालकांना घेऊन थेट महापौरांचा विशेष कक्ष गाठला. सभा सुरू असतानाच या बैठकीसाठी महापौरांनी उपस्थित रहावे, असा आग्रह धरण्यात आला. आयुक्तांनाही सभागृहाच्या वाटेत अडवून या बार मालकांच्या भेटीसाठी नेण्यात आले. ३१ डिसेंबरच्या पाटर्य़ापूर्वी बार मालकांना अग्निशमन दलाचा ‘ना हरकत’ दाखला मिळावा यासाठी ही सगळी खटपट करण्यात आली होती का, असा सवाल विरोधी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित करू लागल्याने सत्ताधारी अडचणीत सापडले आहेत. विशेष म्हणजे, शहरातील लेडीज बार बंद व्हावेत यासाठी सह-पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांच्यासोबत प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे महापालिका आयुक्त असीम गुप्ता हेसुद्धा घाईगर्दीच्या या बैठक ‘प्रतापा’मुळे अडचणीत सापडले आहेत.
पक्षप्रमुखांची नाराजी
दरम्यान, बार मालकांच्या बैठकीसाठी सर्वसाधारण सभा गुंडाळण्याचा प्रकार घडल्याने याप्रकरणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर संजय मोरे यांचे कान उपटल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ही बैठक लेडीज बार मालकांसाठी घेण्यात आली नव्हती, असा खुलासा महापौरांना उद्धव यांच्या आदेशानुसारच करावा लागल्याचे सांगितले जाते. ‘स्थानिक नेते महापालिकेत अवतरल्याने आपल्याला बार मालकांच्या बैठकीसाठी जावेच लागले’, असा खुलासा महापौरांनी उद्धव यांच्याकडे केल्याचे समजते. स्थानिक हॉटेल मालकांचे प्रश्न सुटावेत यासाठी वेगवेगळ्या पर्यायांवर विचार केला जात असून त्यामध्ये लेडीज बार मालकांचे हित साधण्याचा हेतू नाही, असा खुलासाही महापौरांना त्यांच्यापुढे करावा लागल्याचे समजते. यासंबंधी महापौर संजय मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘उद्धवजींचा फोन आला होता’, असे स्पष्ट केले. मात्र, चर्चेचा तपशील देण्यास त्यांनी नकार दिला. विरोधकांना मला बदनाम करायचे असेल तर करू दे, ठाणेकरांना मी कसा आहे हे माहीत आहे, असेही ते म्हणाले.