बीड परिसरात बसमध्ये सापडलेला बेवारस रेडिओ चालकाने घरी नेल्यानंतर त्याचा स्फोट झाल्याची घटना ताजी असतानाच आता औराद-पंढरपूर बसमध्ये एक बेवारस रेडिओ आढळून आला, त्यामुळे सर्वाचे धाबे दणाणले. ती बेवारस वस्तू नेमकी काय आहे हे अगोदर समजले नव्हते, पण नंतर तो रेडिओ असल्याचे नंतर निष्पन्न झाले. पंढरपूर आगारात औराद-पंढरपूर (बस क्रमांक- एमएच १२ सीएस ६५१०) मध्ये कामगार सफाई करीत असताना त्यांना बसमध्ये एक वस्तू दिसली. त्यांनी ही बाब सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. आगारप्रमुख हरिभाऊ साळुंखे यांनी शहर पोलिस स्टेशनला संपर्क साधून बेवारस रेडिओ ताब्यात दिला. या बेवारस रेडिओची तपासणी पोलिस उपअधीक्षक प्रशांत कदम, पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने रेडिओची तपासणी केली. त्यात कुठलीही स्फोटके आढळून आली नाहीत. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून येथे सर्व राज्यांतून लोक दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे पोलिसांनी नेहमीच सतर्क राहणे गरजेचे आहे. बसस्थानकाजवळची पोलिस चौकी नावालाच आहे. तेथे काहीवेळा पोलिस उपस्थित नसतात.
बसमध्ये सापडलेल्या रेडिओत स्फोटके सापडली नसली तरी हा रेडिओ नेमका बसमध्ये कुठून आला, हा प्रश्न कायम असून अज्ञात व्यक्तीने अशा प्रकारे रेडिओ ठेवून चाचणी तर घेतली नसेल असा संशय व्यक्त केला जात आहे.