06 July 2020

News Flash

अपक्ष उमेदवारांची अनोखी प्रचार शैली

आघाडीचे छगन भुजबळ, महायुतीचे हेमंत गोडसे, मनसेचे डॉ. प्रदिप पवार, आपचे विजय पांढरे, डाव्या आघाडीचे अ‍ॅड. तानाजी जायभावे, बसपाचे दिनकर पाटील

| April 22, 2014 06:58 am

आघाडीचे छगन भुजबळ, महायुतीचे हेमंत गोडसे, मनसेचे डॉ. प्रदिप पवार, आपचे विजय पांढरे, डाव्या आघाडीचे अ‍ॅड. तानाजी जायभावे, बसपाचे दिनकर पाटील या रथी-महारथींचा प्रचार नाशिक लोकसभा मतदारसंघात गाजत असतानाच अपक्ष उमेदवारी करणारे अनेक जण आपल्या वेगळ्या शैलीतील प्रचाराने मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणी सायकलवरून, कोणी रिक्षातून तर, कोणी पाच-दहा समर्थकांसह पायीच प्रचार करताना दिसून येत आहेत. तुल्यबळ उमेदवारांविरूध्द आपली लढत असल्याचा उल्लेख त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
राजकीय पक्षांच्या उमेदवारांना कार्यकर्ते आणि आर्थिक बळावर मतदारसंघ पिंजून काढणे सहजशक्य होते. परंतु अपक्ष उमेदवारांना मात्र संपूर्ण मतदारसंघात फिरणे केवळ अशक्य. तरीही अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होत आहेत. त्यासाठी काही उमेदवार तर रात्रीचा दिवस करताना दिसत आहेत. शंख निशाणी मिळालेल्या एका उमेदवाराने आपल्या सायकलवर शंखाची प्रतिकृती बसवून घेतली असून तिला विद्युत रोषणाई केली आहे. रात्री ही सायकल ज्या रस्त्यावरून जाते. त्या परिसरातील वाहनधारक व नागरिकांचे लक्ष विद्युत रोषणाईमुळे चमकणारा शंख वेधून घेतो. कोणतीही घोषणाबाजी न करता मतदारांपर्यंत आपली निशाणी पोहोचविण्यात हा अपक्ष उमेदवार यशस्वी होताना दिसत आहे. उमेदवारीसाठी अनामतीची सर्व रक्कम सुटे नाणे जमा करून भरण्याच्या अनोख्या युक्तीमुळे अपक्ष उमेदवार प्रमोद नाथेकर यांना ‘चिल्लर उमेदवार’ असे संबोधले जात आहे. भ्रष्टाचाराविरोधात आपला लढा असल्याचे सांगणारे नाथेकर यांनी आपण चिल्लर उमेदवार नसल्याचा दावा केला. कपबशी ही त्यांची निशाणी असल्याने ठिकठिकाणी हमखास कपबशीतून चहा मागवून प्रचार करण्यावर भर दिला जात आहे. आपण उमेदवारी मागे घ्यावी म्हणून एका बलाढय़ उमेदवाराच्या गोटातून दबावही टाकण्यात आला होता. परंतु उमेदवारी मागे घेतली असती तर, ज्यांनी अनामतीची रक्कम आपणांस भरता यावी म्हणून पै पै जमा केले. त्यांचा तो अपमान ठरला असता. त्यामुळे उमेदवारीवर ठाम राहिल्याचे नाथेकर यांचे म्हणणे आहे. आपणास निवडून दिल्यास सर्वसामान्यांसाठी १५ रुपयांत जेवण, एक रुपयात लिटरभर बाटलीतील स्वच्छ पाणी, जन्म-मृत्यूचे दाखले घरपोच मोफत अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नाथेकर देत आहेत. याशिवाय आपले नाव मतदान यंत्रावर येण्याची इच्छा होती. त्यातून उमेदवारी करणारा अपक्ष उमेदवार कोणत्याही प्रकारचा प्रचार न करता शांत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2014 6:58 am

Web Title: unique campaigning of independent candidates
Next Stories
1 बौध्द धर्माचा पाया वैज्ञानिक तत्वांवर आधारीत- गौतम गायकवाड
2 नार-पार पाणीवाटपाचा करार तर काँग्रेसचा
3 नाशिकचे मतदारही धास्तावले; हजारोंची नावे यादीतून गायब
Just Now!
X