सर्व नोंदणीकृत कंपन्या व संस्थांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांक (यू.ए.एन.) प्रदान केला आहे. या कंपन्या व संस्थांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याची माहिती देऊन त्यांच्याकडून विशिष्ट फॉर्म भरून घ्यावेत. ही संपूर्ण माहिती येत्या ३१ ऑक्टोबपर्यंत संघटनेकडे द्यावी, असे आवाहन भविष्य निर्वाह निधी संघटना, नागपूर विभागाचे आयुक्त अनिमेश मिश्रा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
हा यू.ए.एन. क्रमांक सक्रिय करण्यासाठी कंपनी व संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याची माहिती कंपनीकडे द्यावी. ही माहिती संघटनेकडे पाठवण्यापूर्वी कंपनी व किंवा संस्थेच्या प्रमुखाने त्यावर डिजिटल स्वाक्षरी करणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन ६ हजार ५०० रुपये आहेत, त्यांच्याच वेतनातून ई.पी.एफ.ची रक्कम कपात होत होती. आता यामध्ये १५ हजार रुपयापर्यंत वाढ करण्यात आली आहे. ज्यांचे वेतन १५ हजार रुपये आहे, असे कर्मचारी भविष्य निवृत्ती वेतन मिळवण्यास पात्र राहतील.  त्याचप्रमाणे मासिक भविष्य निर्वाह सेवानिवृत्ती वेतन आता एक हजार रुपये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुलांना २५० आणि अनाथ असलेल्यांना ७५० रुपये किमान सेवानिवृत्ती वेतन दिले जाणार आहे. भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाने २२ ऑगस्ट २०१४ रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार हे बदल करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पी.एफ.च्या रकमेची माहिती व्हावी, तसेच ही रक्कम त्याला वेळेवर मिळावी, यासाठी गेल्या चार वर्षांपासून प्रक्रियेमध्ये बरेच बदल करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचारी आणि नोंदणीकृत संस्था व कंपन्यामध्ये जागृती होत आहे.
युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांक प्राप्त होणार असल्याने कोणत्या कंपन्या व संस्थेकडे किती कर्मचारी काम करीत आहेत, याची अचूक माहिती संघटनेला प्राप्त होईल. आपल्या ई.पी.एफ. खात्यात किती रक्कम जमा झाली आहे, याची माहिती प्रत्येक कर्मचाऱ्यांना ऑनलाईन प्राप्त होऊ शकते. नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ात जवळपास नोंदणीकृत साडे पाच हजार कंपन्या व संस्था असून त्यात चार लाख कर्मचारी काम करीत असल्याची माहितीही अनिमेश मिश्रा यांनी दिली. यावेळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, नागपूर विभागाचे आयुक्त (दोन) सनतकुमार आणि हेमंत तिरपुडे उपस्थित होते.