पुणे विद्यापीठामध्ये जून महिन्यापर्यंत कार्यरत असलेले तीनशेहून अधिक कंत्राटी कर्मचारी अजूनही वेतनाच्या प्रतीक्षेत असून कंत्राट संपून सहा महिने होऊनही या कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन मिळालेले नाही.
पुणे विद्यापीठामध्ये जून २०१२ पर्यंत साधारण साडेचारशे कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर कार्यरत होते. त्यापैकी तीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांना अजूनही वेतन मिळालेले नाही. जानेवारी २०१० ते जून २०१२ या कालावधीमध्ये हे कर्मचारी विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये काम करत होते. सोलापूरमधील ‘शक्ती’ कंपनीच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांबरोबर कंत्राट करण्यात आले होते. आर्थिक गैरव्यवहार केल्यामुळे या कंपनीला नव्याने कंत्राट देण्यात आले नाही. शासनाच्या नियमानुसार दर सहा महिन्यांनी या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात येत होती. मात्र, प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या हातात वाढलेले वेतन मिळत नव्हते. त्याचप्रमाणे वेतनातून प्रॉव्हिडंट फंडासाठी कापण्यात येणारे पैसेही या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले नव्हते. या सर्व कर्मचाऱ्यांचे कंत्राट संपताना काही कर्मचाऱ्यांनी ही बाब उघडकीस आणून त्याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर वेतनातील फरक देण्यात येणार असल्याचे या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. त्याप्रमाणे एकूण साडेचारशे कर्मचाऱ्यांपैकी काही जणांचे वेतन विद्यापीठाने दिले आहे. मात्र, अजूनही साधारण तीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन मिळालेले नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान ८ हजार ते १५ हजार रुपये वेतन अजून मिळायचे आहे. त्याचप्रमाणे या कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसेही अजून जमा करण्यात आलेले नाहीत. गेली सहा महिने शक्ती कंपनी आणि विद्यापीठाकडून या कर्मचाऱ्यांना टोलवा टोलवीची उत्तरे मिळत आहेत. याबाबत कंत्राटी कर्मचारी भगवान ओमाटे यांनी सांगितले, ‘‘आम्ही अनेकवेळा चौकशी करूनही आमचे वेतन किंवा प्रॉव्हिडंट फंड जमा करण्यात आलेला नाही. याबाबत शक्ती कंपनीकडे विचारणा केल्यावर विद्यापीठाकडूनच वेतन जमा न झाल्याचे सांगितले जाते, तर विद्यापीठामध्ये चौकशी केल्यावर शक्तीने गैरव्यवहार केल्यामुळे वेतन रखडल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अनेक वेळा विद्यापीठ प्रशासनाकडे चौकशी करूनही याबाबत अजूनही कार्यवाही करण्यात आलेली नाही.’’