दुष्काळग्रस्त भागातील अनेक विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीत खानावळीसाठी लागणारी रक्कम व मोफत निवासाची सोय करण्याचे आश्वासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने दिले होते. परंतु ते पाळले न गेल्याने चिडलेल्या २५० विद्यार्थ्यांनी कुलगुरू व कुलसचिवांना घेराव घातला. गेल्या महिन्यातील कमवा-शिका योजनेचे मानधनही दिले नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले. कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन १ मे ते ३०जून दरम्यान खाणावळीस लागणारी रक्कम व मोफत निवासाची सोय करण्यात आल्याचे सांगितले. या प्रकरणी प्रशासकीय दिरंगाई झाल्याचे त्यांनी मान्य केले.
विद्यापीठात शिकणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्याच्या सुटीत मोफत भोजन व निवासाची सोय उपलब्ध करून दिली जाईल, असे सांगितले होते. विद्यापीठातील एका विद्यार्थिनीला आर्थिक चणचण असल्याचे लक्षात आल्यानंतर काही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन अशा प्रकारची योजना सुरू करावी, असे कळविले होते. या अनुषंगाने खासदार सुप्रिया सुळे, आमदार सतीश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांना भेटी दिल्या. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने अशा मुलांसाठी मदतनिधी देण्याचे आवाहन केले. मोठय़ा प्रमाणात निधीही गोळा झाला. मात्र, त्याचा उपयोग सुटीच्या कालावधीत झालाच नाही. त्यामुळे वसतिगृहात राहणारे विद्यार्थी सोमवारी चिडले व सकाळी कुलगुरूंच्या निवासस्थानी त्यांनी मोर्चा गेला. कुलगुरू निवासस्थानी नाहीत, असे कळविल्यानंतर विद्यार्थ्यांनी कुलसचिवांचे दालन गाठले. सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांनी कुलसचिवांसमोर गाऱ्हाणे मांडले. कुलसचिवांची तातडीची बैठक घेत प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या दूर केल्याचे कुलसचिव माने यांनी सांगितले.