दीपोत्सवात अवघे शहर रंगीबेरंगी रोषणाईने न्हाऊन निघाले असताना अनेक भागांतील पथदीप दुरुस्तीअभावी बंद असल्याने नागरिक व वाहनधारकांना अंधारात चाचपडत मार्गक्रमण करावे लागत आहे. एलईडी पथदीप बसविले जाणार असल्याने पालिकेने नादुरुस्त जुन्या पथदीपांच्या दुरुस्ती करण्याकडे कानाडोळा केला आहे. एलईडीचे कामही रखडल्याने नवीन पथदीप लागत नाहीत आणि जुनेही दुरुस्त केले जात नाहीत, अशी विचित्र स्थिती आहे. अनेक भागांत अंधार पसरल्याने चोरटय़ांनाही मोकळे रान मिळाले असून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दुसरीकडे ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला कित्येक दिवसांपासून पथदीपांच्या पडलेल्या खांबामुळेही वाहतुकीत अडथळे येत आहेत.
शहर व परिसरात दीपोत्सव उत्साहात साजरा झाला असला तरी आकाशदिवे व विद्युत रोषणाईचा झगमगाट अद्याप कायम आहे. इमारती व व्यावसायिक संकुले तसेच दुकाने दीपमाळांनी बहरल्याने पालिकेच्या पथदीपांकडे फारसे कोणाचे लक्ष गेले नाही. आसमंत रोषणाईने उजळून निघाला असताना अनेक रस्ते अंधारात आहेत. नाशिकरोड, पंचवटी, सातपूर, अंबड, सिडको, कॉलेज व गंगापूर रोड, मखमलाबाद, आडगाव असा कोणताही भाग त्यास अपवाद नाही. उपरोक्त भागातील कॉलन्यांमधील अनेक पथदीप नादुरुस्त आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यांसह अनेक वस्त्यांमधील भाग अंधारात बुडालेला आहे. काही भागांतील पथदीप तर कित्येक महिन्यांपासून बंद आहेत. स्थानिकांनी नगरसेवक व पालिकेकडे तक्रार करूनही फारसा उपयोग झाला नाही. पथदीप दुरुस्त करावेत, सणासुदीच्या काळात रस्त्यांवर अंधार असू नये याची खबरदारी घ्यावी यासाठी काही नगरसेवकांनी पाठपुरावा केला. मात्र सुस्त प्रशासन ‘एलईडी’च्या विषयामुळे जुन्या पथदीपांची दुरुस्ती करण्यास उत्सुक नाही. एलईडीचे नवीन पथदीप लवकर बसविले जाणार असल्याने जुन्या पथदीपांच्या दुरुस्तीसाठी का खर्च करावा, अशी पालिकेच्या विद्युत विभागाची मानसिकता आहे. या एकमेव कारणास्तव शहरातील एका मागोमाग एक पथदीप बंद पडत असले तरी त्यांची दुरुस्ती होत नाही. एलईडीचे काम रखडल्याने नवीन पथदीपही लागत नाहीत आणि जुन्यांची दुरुस्ती होत नाही या कात्रीत शहरवासीय अडकले आहेत.
शहरात पालिका ठेकेदारामार्फत जवळपास ५० हजार एलईडी पथदीप बसविणार आहे. वेगवेगळ्या कारणास्तव रखडलेला हा प्रकल्प आजही गटांगळ्या खात आहेत. आतापर्यंत १७५० नवीन पथदीप बसविण्यात आले. ज्या थाटणीने हे काम सुरू आहे ते पाहिल्यास पुढील कित्येक वर्षे त्यास कमी पडू शकतील. त्यातच या पथदीपांसाठी अनेक रस्त्यांच्या कडेला नवीन खांब आणून टाकण्यात आले आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. बंद पथदीपांवरून ओरड होऊ लागल्याने पालिकेने दुरुस्तीसाठी साहित्य खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एलईडी पथदीव्यांची उभारणी आणि बंद पडलेले पथदीप यांचा काहीही संबंध नसल्याचे विद्युत विभागाने म्हटले आहे. पथदीपांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक ते साहित्य नसल्याने या विभागाने निविदा प्रक्रियेद्वारे ते खरेदी केले. तसेच काही खांब जीर्ण अवस्थेत असल्याने त्या जागी नवे खांब बसविण्याची तयारी करण्यात आली आहे. या संदर्भातील उर्वरित कामे साधारणत: आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत पूर्ण होऊन संबंधित परिसर प्रकाशमय होईल, असा दावा पालिकेच्या विद्युत विभाग कार्यकारी अभियंता व्ही. जी. लाड यांनी केला. दरम्यान, गल्लीबोळातील बंद पथदीपामुळे भुरटय़ा चोरांसह चोरटय़ांचे फावले आहे. अंधाराचा फायदा घेत बंद घरांना लक्ष्य करत सफाईदारपणे चोरीचे सत्र सुरू आहे. अंधार असल्याने पोलीस गस्तीवर असले तरी चोरांचा छडा लावणे किंवा माग काढण्यात त्यांना अडचणी येत आहेत. अंधारामुळे चोरीच्या घटना वाढत असताना पालिकेला कधी जाग येणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.