उरण तालुक्यात वाढती अवजड वाहने त्याचबरोबर जिथे नजर पोहोचेल तेथे केवळ कंटेनरच कंटेनर दिसत असून उरण तालुका कंटेनरमय बनला आहे. तालुक्यात दररोज येणाऱ्या हजारो वाहनांमुळे उरण तालुक्याला प्रदूषणानेही ग्रासले आहे. तालुक्याला हिरवेगार करण्यासाठी उरण तहसील कार्यालयाने पुढाकार घेतला आहे.त्यासाठी वन, कृषी, शेती तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने उरण तालुक्यात दोन लाख वृक्षांची लागवड करून उरणला प्रदूषणमुक्त तालुका करण्याचे लक्ष ठेवण्यात आले असून त्यासाठी उरण तहसील कार्यालयात स्वतंत्र यंत्रणा राबविण्यात येणार असल्याची माहिती उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांनी दिली आहे.
उरण तालुका हा हिरवीगार भात शेती, नारळाची, आंब्याची झाडे यांनी बहरलेले टूमदार गाव होते, जेएनपीटी बंदराची निर्मिती होईपर्यंत उरणला गावाचेच स्वरूप होते. मात्र बंदर आले आणि तालुक्यात रस्तेच रस्ते आणि बंदरावर आधारित उद्योग व त्यातून भले मोठे मालवाहू कंटेनरचे यार्डाची सुरुवात झाली. त्यामुळे तालुकाचा विकास झाला. मात्र नैसर्गिकदृष्टय़ा तालुका भकास होऊ लागला आहे. याची नोंद घेऊन उरण सामाजिक संस्थेने उरणच्या तहसीलदारांना तालुक्यातील औद्योगिक विभागांकडून वृक्षारोपण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार तालुक्यातील कंटेनर यार्डच्या मालकांना बोलावून तहसीलदारांनी घेतलेल्या बैठकीत कंटेनर यार्डातील प्रत्येक गुंठय़ामागे एक तरी वृक्षाची लागवड करावी, अशी सूचना करण्यात आलेली असल्याची माहिती उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे उरण तालुक्यात कोणती झाडे उपयुक्त आहेत. याची यादी वन विभागाकडून देण्यात येणार आहे. या मोहिमेला एनएसएसच्या तीनशे विद्यार्थ्यांचाही हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.