टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वसंतोत्सवाच्या पहिल्या पुष्पात रविवारी सिने-नाटय़, कला, संगीत आदी क्षेत्रांतील १६ वसंतांच्या कारकीर्दीचा आढावा नेटक्या पद्धतीने घेण्यात आला. सुरेश खरे, इला भाटय़े, रजनी वेलणकर, स्पृहा जोशी यांनी कविता वाचन तर मधुरा कुंभार, श्रीरंग भावे आणि अजित परब यांनी गाणी सादर केली. इला भाटय़े यांनी व.पु.काळेंची निगेटिव्ह कथा वाचली. कमलेश भडकमकर यांनी संगीत संयोजन केले. सोमवारी हर्मोनिअम वाद्याची वाटचाल उलगडून दाखविणारी ‘जादूची पेटी’ ही खास मैफल आदित्य ओक आणि सत्यजीत प्रभू यांनी रंगवली. हर्मोनियमचा जन्म, त्यात काळानुरूप झालेले बदल, या वाद्याचे संगीत मैफलीतील योगदान आदी पैलू या मैफलीत उलगडण्यात आले. शास्त्रीय संगीत, नाटय़संगीत, विविध हिंदी मराठी चित्रपटगीते या मैफलीत सादर करण्यात आली. सुरत पिया की, अपलम चपलम, हसता हुआ नुरानी चेहरा, विकत घेतला श्याम, तुम्हावरी केली मी मर्जी बहाल, ससा तो ससा, झुमका गिरा रे, कजरा मुहोब्बतवाला आदी गाण्यांच्या सुरावटीने श्रोते मंत्रमुग्ध झाले. प्रा. मिलिंद कुलकर्णी यांच्या नेटक्या सूत्र संचालनाने मैफलीची रंगत वाढवली.