शासनस्तरावर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत जेव्हा विचार समोर येईल त्यावेळी वाशीमचा प्राधान्याने विचार करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण व फलोत्पादन मंत्री व पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी येथे दिली.
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या सभेत अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा चौधरी, खासदार भावना गवळी, खासदार संजय धोत्रे, आमदार सुभाष झनक, आमदार प्रकाश डहाके, आमदार लखन मलिक, विधान परिषद सदस्य विनायक मेटे, विभागीय आयुक्त डी.आर.बनसोड, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अशासकीय सदस्य खडसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुक्ला व पोलीस अधीक्षक सुधीर हिरेमठ उपस्थित होते
जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्ह्य़ात राबविण्यात आलेल्या विविध विकास योजनांवर नोव्हेंबर २०१२ अखेर १८ कोटी ३१ लाख १४ हजार रुपये खर्च झाले. दुष्काळ व इतर कामांसाठी निधी मोठय़ा प्रमाणात लागत असल्यामुळे अर्थसंकल्पात कपातीची शक्यता आहे.
अधिकाऱ्यांनी प्राप्त झालेला निधी नियोजित वेळेत खर्च होईल, या दृष्टीने काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. २०१३-१४ ची सर्वसाधारण वार्षकि योजना ७० कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजना ३१ कोटी ६६ लाख आणि आदिवासी उपयोजना १३ कोटी ७७ लाख ८३ हजार रुपयाची राहणार असून, या योजनेच्या प्रारूप आराखडय़ास जिल्हा नियोजन मंडळांने मंजुरी दिली व २०१३-१४ या वर्षांत जिल्ह्य़ातील प्रत्येक गाव रस्त्याने जोडले जाईल. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
याप्रसंगी झालेल्या चच्रेत ग्रामीण रस्ते, सिंचन विभागाच्या रखडलेल्या योजना, अंगणवाडीचे बांधकाम, पळसखेडचे पुनर्वसन, मालेगाव, रिसोड, वाशीम तालुका क्रीडा संकुल, तिर्थक्षेत्र विकास, शिक्षकांची रिक्त पदे आदी विषयावर सविस्तर चर्चा झाली. पाटबंधारे विभागाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जानेवारीत मुंबई येथे जलसंपदा विभागाचे मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी आर.जी. कुळकर्णी यांनी प्रास्ताविकात जिल्ह्य़ात राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या खर्चाची आकडेवारी सांगितली. जिल्हा नियोजन अधिकारी बी.जी.राठोड यांनी कार्यक्रमाचे संचालन व आभार मानले.
वाशीम येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला असून तो ठराव शासनास सादर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. गावीत यांनी यावेळी स्पष्ट केले.
या सभेस जिल्हा नियोजन समितीचे अशासकीय सदस्य व विविध विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.