वेरुळ लेणीसमोरील वाहनतळ व्हिजिटर सेंटरमध्ये हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लेणीच्या अगदी जवळ वाहने येत असल्याने त्याच्या धुरामुळे लेणींवर परिणाम जाणवत आहे. त्यामुळे आठ-दहा महिन्यांपूर्वी दिलेल्या या प्रस्तावाची नव्याने उजळणी केली जात आहे. अजिंठा लेणीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, तर वेरुळमध्ये बॅग स्कॅनर हे साहित्यही सुरक्षिततेसाठी ठेवले जाणार आहे.
वेरुळ लेणीच्या समोरच्या बाजूला जातानाच वाहनतळ आहे. मोठय़ा संख्येने येथे वाहने उभी केली जातात. लेणी पाहण्यासाठी ऑटो रिक्षा, चारचाकी वाहनेही नेता येतात. त्यामुळे वाहनांची वर्दळ असते. वेरुळ व्हिजिटर सेंटरमध्ये वाहनतळास मोठी जागा उपलब्ध आहे. मात्र, हे सेंटर लेणीपासून दोन किलोमीटर दूर आहे. तेथून पर्यटकांना पुन्हा लेणीपर्यंत आणण्यासाठी वेगळा आराखडा बनविला जात आहे. लेणीसमोरील वाहनतळाचे व्यवस्थापन पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे. व्हिजिटर सेंटरचे काम राज्य पर्यटन विभागामार्फत चालते. त्यामुळे वाहनतळ बदलण्यास पुन्हा पत्रव्यवहार सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच वेरुळ व्हिजिटर सेंटर सुरू झाले आहे.
अजिंठा लेणीच्या सुरक्षिततेसाठी २१ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. हे कॅमेरे हलणारे आहेत. वेरुळमध्ये मात्र येणाऱ्या पर्यटकांच्या पिशव्या आणि बॅगा तपासण्यासाठी बॅग स्कॅनरही ठेवले जाणार आहे. तिकीट खिडकीजवळच बॅग स्कॅनर असेल, असे पुरातत्त्व विभागाचे डॉ. सुब्रमण्यम यांनी सांगितले.